Rishabh Pant MS Dhoni, IPL 2025: लखनौ सुपर जायंट्स संघाने रिषभ पंतला २७ कोटींना विकत घेऊन कर्णधार केले. तो लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी झाला. त्यामुळे, त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो त्या पूर्ण करू शकला नाही. पंत संपूर्ण हंगामात खराब फॉर्मशी झुंजत आहे. पंजाब किंग्जविरुद्ध १७ चेंडूत १८ धावा केल्यानंतर तो बाद झाला. तर या हंगामात तो ११ सामन्यांमध्ये १२.८ च्या सरासरीने आणि ९९ च्या स्ट्राईक रेटने फक्त १२८ धावा करू शकला. त्याची कामगिरी पाहून टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पंतला त्याच्या लयीत परतण्यासाठी धोनीची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.
धोनीला कॉल कर, जुने व्हिडीओ बघ...
ज्या खेळींमध्ये रिषभ पंतने भरपूर धावा केल्या आहेत, त्या खेळींचे व्हिडीओ पुन्हा बघण्याचा सल्ला वीरेंद्र सेहवागने पंतला दिला आहे. क्रिकबझवर लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याचे विश्लेषण करताना त्याने हा सल्ला दिला. दुखापतीनंतर रिषभ पंतचा फॉर्म गेला आहे. त्याला पूर्वीसारखी फलंदाजी करता येत नाहीये असेही तो म्हणाला. जर पंत धोनीला आपला आदर्श मानत असेल तर त्याने त्याच्याशी फोनवर बोलले पाहिजे असेही सेहवाग म्हणाला. सेहवाग म्हणाला, "जर त्याला वाटत असेल की तो स्वत: नीट विचार करू शकत नाही, तर त्याला मदत करणारे अनेक क्रिकेटपटू आहेत. त्याच्याकडे फोन आहे. त्याने फोन हातात घ्यावा आणि वाटेल त्या कोणालाही फोन करावा. जर तो धोनीला त्याचा आदर्श मानत असेल तर त्याने धोनीशी बोलले पाहिजे."
पंत हार मानणार नाही...
माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूने पंतच्या खराब फॉर्मबद्दल दुःख व्यक्त केले. पण त्याने पंतला हार न मानणारा खेळाडू म्हटले. तो म्हणाला की पंतच्या धावा होत नसल्या, तरीही तो आपल्या जुन्या पद्धतीनेच खेळतोय. फॉर्म जाणे हा टप्पा सर्व खेळाडूंच्या बाबतीत घडतो. परंतु आशा आहे की तो अशा परिस्थितीत हार मानणार नाही. पंतकडे मधल्या फळीत खेळण्याचे कौशल्य आहे, पण ते योग्यरित्या अंमलात आणण्याची मानसिकता त्याच्याकडे सध्या नाही. तो लवकरच चांगल्या फॉर्ममध्ये परतेल, असा विश्वास अंबाती रायुडूने व्यक्त केला.