नवी दिल्ली : यूएईत येत्या शनिवारपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या १३ व्या सत्रादरम्यान सट्टेबाजी आणि फिक्सिंगवर करडी नजर ठेवण्यासाठी बीसीसीआयने ब्रिटनमधील स्पोर्टस रडार या कंपनीची सेवा घेण्याचे ठरवले आहे. ही कंपनी लीगदरम्यान भ्रष्ट पद्धतीचा शोध लावणाऱ्या यंत्रणेद्वारा(एफडीएस) सेवा देणार आहे.
कोरोनामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन होईल. अशावेळी निवृत्त पोलीस महासंचालक अजितसिंग यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकापुढे (एसीयू) वेगळ्या प्रकारचे आव्हान असणार आहे. याआधी काही लीगदरम्यान सट्टेबाजीशी संबंधित भ्रष्ट प्रकार घडले होते. आयपीएलदरम्यान सट्टेबाजी आणि फिक्सिंगचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,असा बीसीसीआयला संशय आहे.
स्पोर्टस् रडार ही कंपनी एसीयूसोबत काम करणार असून सेवा प्रदान करेल. स्पोर्टस् रडारने अलिकडे गोवा फुटबॉल लीगदरम्यान किमान सहा सामन्यावर संशय व्यक्त केला होता. स्पोर्ट्स रडारने याआधी फिफा, यूएफा तसेच जगातील विविध फुटबॉल लीगसोबत काम केले आहे. एसीयूने अलिकडे तामिळनाडू प्रीमियर लीगसह राज्यस्तर टी-२० लीगदरम्यान सट्टेबाजीच्या वेगवेगळ्या प्रकारांचा शोध घेतला. वेगवेगळ्या प्रकारे सट्टा लावल्यामुळे एक प्रमुख कंपनीने सट्टा लावणे एसीयूच्या तपासात आढळून आले. (वृत्तसंस्था)
- स्पोटर््स रडारनुसार भ्रष्ट पद्धतीचा शोध घेणारी यंत्रणा(एफडीएस)ही वेगळी सेवा आहे. खेळात सट्टेबाजी आणि फिक्सिंगशी संबंधित अफरातफरीचा याद्वारे शोध लागतो. मॅचफिक्सिंगच्या हेतूने सामन्यावर लावल्या जाणाºया बोलीचा हेतू समजणारी प्रणाली एफडीएसकडे उपलब्ध असल्यामुळे खेळातील भ्रष्ट गोष्टी उघड होतात.