Join us  

Breaking : भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे स्टार फलंदाज उर्वरित मालिकेला मुकणार

India vs England Test Series : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून १-१ अशी बरोबरी मिळवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 11:53 AM

Open in App

India vs England Test Series : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून १-१ अशी बरोबरी मिळवली. पण, तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचं टेंशन वाढलं आहे. विराट कोहली खेळणार की नाही, याबबत तर्कवितर्क सुरू असताना मधल्या फळीतील फलंदाजाला दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याच्या पाठीच्या दुखण्यानं पुन्हा डोकं वर काढलं आहे आणि त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार श्रेयसच्या पाठ आणि कंबर पुन्हा दुखू लागली आहे आणि त्यामुळे उर्वरित मालिकेत त्याचे खेळणे संकटात आले आहे. १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे तिसरी कसोटी सुरू होणार आहे आणि त्यासाठी ११ तारखेला खेळाडूंना राजकोट येथे पोहोचण्यास बीसीसीआयने सांगितले आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर आज उर्वरित कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयसला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल आणि तेथे त्याच्यावर उपचार सुरू होतील. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी तो पूर्णपणे बरा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मागच्या वर्षी श्रेयसच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली गेली होती.  "अय्यरने भारतीय संघ व्यवस्थापन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कळवले आहे की ३० पेक्षा जास्त चेंडू खेळल्यानंतर त्याची पाठ ताठ होते आणि पुढे बचावात्मक खेळताना त्याला कंबरदुखीचा त्रास जाणवतो," असे एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. “शस्त्रक्रियेनंतर, त्याला प्रथमच या समस्येचा सामना करावा लागत आहे म्हणून त्याला काही आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तो नंतर एनसीएकडे जाईल.” 

तिसऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुल व रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन होणार असल्याने भारतीय संघाची फार डोकेदुखी वाढणार नाही. या दोघांना दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली होती. दुसऱ्या कसोटीत रजत पाटीदारला पदार्पणाची संधी दिली गेली होती, परंतु त्याला फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे राजकोट येथे सर्फराज खानला संधी मिळू शकते.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडश्रेयस अय्यर