Join us  

Breaking : अंबाती रायुडूनं निवृत्तीचा निर्णय घेतला मागे; पुन्हा क्रिकेट खेळण्याची व्यक्त केली इच्छा

दोन महिन्यांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या अंबाती रायुडूला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचे वेध लागले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 11:59 AM

Open in App

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या अंबाती रायुडूला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचे वेध लागले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला त्यानं पत्र पाठवले आणि त्यात त्यानं निवृत्तीचा निर्णय भावनेच्या भरात घेतल्याचे स्पष्ट केले. त्याने पुन्हा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला,'' चेन्नई सुपर किंग्स, व्ही व्ही लक्ष्मण आणि नोएल डेव्हीड यांचे आभार. त्यांनी या कठीण काळात मला पाठींबा दिला आणि माझ्यात अजून क्रिकेट शिल्लक आहे, याची जाणीव करून दिली. त्यामुळे मी माझा निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे. तो  निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता.'' 

वर्ल्ड कप स्पर्धेत शिखर धवन व विजय शंकर दुखापतीमुळे माघारी फिरूनही रायुडूच्या नावावर काट मारत बीसीसीआयनं रिषभ पंत व मयांक अग्रवाल यांना लंडनला पाठवले होते. त्यामुळे रायुडू नाराज होता. त्यानं शंकरच्या निवडीनंतर ती नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती आणि त्यानंतर त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला होता. 33 वर्षीय रायुडूनं  55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याची निवड केली गेली नाही. 

पण, आता त्यानं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून पुन्हा खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, ''मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे आणि सर्व प्रकारच्या क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे. हैदराबाद संघासोबत पुढील मोसमात खेळण्याची इच्छा आहे आणि मी सर्व कौशल्य पणाला लावून संघासाठी योगदान देईन. मी 10 सप्टेंबरपासून हैदराबाद संघासाठी उपलब्ध आहे.'' 

रायुडूनं भारताकडून 6 ट्वेंटी-20 सामन्यांत 42 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 97 सामन्यांत 45.56 च्या सरासरीनं 6151 धावा कुटल्या आहेत आणि त्यात 16 शतकं व 34 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने 160 सामन्यांत 5103 धावा केल्या, तर सर्व प्रकारच्या 216 ट्वेंटी-20 लढतीत 4584 धावा चोपल्या आहेत. त्यात एका शतकाचाही समावेश आहे. 

 

टॅग्स :अंबाती रायुडूबीसीसीआयचेन्नई सुपर किंग्स