मुंबई: कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलला निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन माघारी बोलावण्यात आलं आहे. पांड्या आणि राहुलची कारकीर्द संकटात सापडली असताना आता त्यांना आर्थिक फटकेदेखील बसू लागले आहेत. हार्दिक आणि राहुलच्या वादग्रस्त विधानांचा फटका त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूला बसला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्यापासून चार हात लांब राहण्याचा विचार करत आहेत.
हार्दिक पांड्याला पहिला फटका जिलेट मार्क 3नं दिला. आक्षेपार्ह विधानामुळे वाद वाढू लागताच जिलेटनं पांड्यासोबतचा करार संपुष्टात आणला. 'हार्दिकच्या विधानाशी कंपनीचा कोणताही संबंध नाही. त्याचं विधान आमची मूल्यं दर्शवत नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आम्ही स्वत:ला त्याच्यापासून वेगळं करत आहोत,' असं स्पष्टीकरण कंपनीच्या प्रवक्त्यानं दिलं. हार्दिक पांड्या सध्या 7 ब्रँड्सच्या जाहिरातीत दिसतो. तर के. एल. राहुल स्पोर्ट्स वेअरमधील प्रसिद्ध ब्रँड पुमा आणि फिटनेस स्टार्टअप क्युअरफिटशी करारबद्ध आहे. या ब्रँड्सनी अद्याप तरी दोघांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. 
एखादा खेळाडू वादात सापडल्यास ब्रँडनं त्याच्यापासून दूर जाणं, करार संपुष्टात आणणं सामान्य बाब असल्याचं स्टार्सच्या ब्रँड व्हॅल्यूशी संबंधित अहवाल देणाऱ्या डफ अँड फेल्प्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अवरिल जैन यांनी सांगितलं. ही बाब स्पष्ट करुन सांगताना त्यांनी अभिनेता आमिर खान आणि गोल्फर टायगर वूड्सचं उदाहरण दिलं. हे दोघे वादात सापडल्यावर त्यांच्याशी संबंधित अनेक ब्रँड्सनी करार संपुष्टात आणले होते, याकडे जैन यांनी लक्ष वेधलं.