Vaibhav Suryavanshi, Cricket Ban IPL 2025: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने अवघ्या १४व्या वर्षी असा पराक्रम केला, जो भल्याभल्या महान खेळाडूंनाही जमलेला नाही. वैभवने इतक्या लहान वयात IPL मध्ये तगड्या गोलंदाजांसमोर फक्त ३५ चेंडूत शतक ठोकले. त्याच्या खेळीनंतर संपूर्ण जगाने त्याचे कौतुक केले. सारेच वैभव सूर्यवंशीला सलाम करत आहेत. पण काही लोक त्याच्यावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. असाच एक दिग्गज म्हणजे बॉक्सर विजेंदर सिंग. त्याने वैभव सूर्यवंशीवर वयचोरीचा आरोप केला आहे.
विजेंदर सिंगचे ट्विट...
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी पाहिल्यानंतर विजेंदर सिंगने त्याच्या ट्विटरवर एक पोस्ट लिहिली - आजकाल लोक वय कमी करून क्रिकेट खेळू लागले आहेत, अशी ती पोस्ट होती. विजेंदर सिंगची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. बहुतांश लोकांनी विजेंदर सिंगवर टीका केली. त्याच्या वयाकडे नाही तर त्याच्या प्रतिभेकडे पहा, असे काहींनी लिहिले. पण काहींनी मात्र वयाबाबतच्या कमेंटवर प्रश्न विचारले.
वैभव सूर्यवंशीवर असे आरोप का केले जात आहेत?
वैभव सूर्यवंशीवर वयाच्या फसवणुकीचा आरोप केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे, खरंतर हा खेळाडू १४ वर्षांचा आहे पण त्याची उंची तुलनेने बरीच जास्त आहे. तसेच तो जे फटके खेळतो तेदेखील अप्रतिम असतात. ९०-९० मीटर लांब षटकार मारणे हे १४ वर्षांच्या मुलासाठी जवळजवळ अशक्य वाटते. पण त्याने ते करून दाखवले आहे. तसेच, बीसीसीआयच्या अनेक स्पर्धांमध्ये तो खेळला असून, वयोगटाच्या निकषांंमध्ये तो कधीही दोषी आढळलेला नाही.
वयात फसवणूक आढळल्यास...
जर कोणताही भारतीय क्रिकेटपटू वयचोरीच्या प्रकरणात दोषी आढळला तर बीसीसीआय त्याच्यावर कठोर कारवाई करते. त्या खेळाडूवर बंदीही येऊ शकते. वयाची फसवणूक करणाऱ्या क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी घातली जाते. त्या दरम्यान तो बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत किंवा लीगमध्ये खेळू शकत नाही. अंकित बावणे, नितीश राणा, रसिक सलाम, मनजोत कालरा, प्रिन्स राम निवास यादव हे खेळाडू वयचोरीमध्ये दोषी आढळले होते.