नवी दिल्ली : कोरोनामुळे आयसीसीने चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा घामाचा वापर करण्यास बंदी आणल्यास वेगवान गोलंदाजांना नव्या उपाययोजनांसह सज्ज राहावे लागेल, असे मत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने सोमवारी व्यक्त केले.
कोरोनामुळे आयसीसीने लाळेऐवजी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यास परवानगी देण्याचा विचार पुढे आणला आहे. या पर्यायावर क्रिकेट विश्वातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आयपीएल फ्रेन्चायसी दिल्ली कॅपिटल्सच्या ‘इन्स्टाग्राम लाईव्ह’वर बोलताना ईशांत म्हणाला, ‘क्रिकेटमध्ये बदल आणि नव्या नियमांचा समावेश कररण्याविषयी चर्चा होत आहे. खेळाडूंना नव्या नियमानुरुप स्वत:ला सज्ज करावे लागेल. लाळेचा वापर होणार नसेल तर चेंडूला तुमच्या आवडीनुसार चकाकी येणार नाही. तथापि दुसरा पर्याय देखील नाही. माझ्या मते भविष्याची फार चिंता करण्याऐवजी वर्तमानात जगणे अधिक चांगले.’ (वृत्तसंस्था)