लंडन, दि. 23 - पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीचे नाव घेतले की नजरेसमोर येते ती विस्फोटक फलंदाजी. आफ्रिदीने पाकिस्तानकडून दीर्घकाळ खेळताना अनेक झंझावाती खेळी केल्या होत्या. अगदी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रमही आफ्रिदीच्या नावे होता. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर झाला असता तरी आफ्रीदीमध्ये तो जुना जोश अद्यापही कायम आहे. त्याचाच प्रत्यय देत आफ्रिदीने पुन्हा एकदा अचाक कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. इंग्लंडमघील नॅटवेस्ट टी-20 ब्लास्ट क्रिकेट स्पर्धेत खेळताना त्याने अवघ्या 42 चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. त्याने दहा चौकार आणि सात षटकारांसह 101 धावा कुटल्या. आफ्रिदीचे हे ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले आहे.
डर्बिशायर आणि हॅम्पशायर यांच्यात झालेल्या नॅटवेस्ट टी-20 ब्लास्ट क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आफ्रिदीने धुवांधार फलंदाजी केली. मंगळवारी झालेल्या या सामन्यात डर्बिशायर संघाचा कर्णधार गॅरी विल्सन याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रतिस्पर्धी हॅम्पशायरकडून 37 वर्षीय शाहिद आफ्रिदीने डावाची सुरुवात केली. त्याने फलंदाजीस आल्यापासून चौफेर फटकेबाजी करत मैदानात चौकार षटकारांची बरसात केली. आफ्रिदीच्या या झंझावातासमोर प्रतिस्पर्धी गोलंदाज हतबल झाल्याचे चित्र दिसत होते. सुसाट सुटलेल्या आफ्रिदीने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर शतकी मजल गाठायला त्याला 42 चेंडू लागले.
या खेळीदरम्यान आफ्रिदीने सलामीला केविन डिकिंन्सनसोबत 43 धावांची आणि दुसऱ्या विकेटसाठी जेम्स विन्ससह 97 धावांची भागीदारी केली. आफ्रिदीच्या या खेळीच्या जोरावर हॅम्पशायरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत आठ गडी गमावून 249 धावांपर्यंत मजल मारली होती. या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना डर्बिशायर संघाचा डाव 148 धावांवर आटोपला. अशा रीतीने हा सामना हॅम्पशायरने 101 धावांनी जिंकला
एकदिवसीय क्रिकेटमध्येही आफ्रिदीने अवघ्या 36 चेंडूत शतक फटकावण्याचा विक्रम केला होता. 1996 साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना आफ्रिदीने ही कामगिरी केली होती. त्यावेळी तो केवळ 16 वर्षांचा होता. त्यानंतर आफ्रिदीने भारताविरुद्ध खेळताना पन्नासहून कमी चेंडूत शतक फटकावण्याचा पराक्रम केला होता.