मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर सट्टा घेणारे रॅकेट मुंबई पोलिसांनी शनिवारी उध्वस्त केले असून आतापर्यंत त्यांच्याकडून तब्बल १४ कोटींचे बेटींग घेतल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका परप्रांतीयासह दोघा बुकींना अटक केली असून मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे.
विश्वास किशन टाकलकर (वय ५१, महापालिका चाळ, मुसाफिर खाना, मुंबई) व अजय कांतराज(२४ रा.एअर पोर्ट रोड, बंगळूर) अशी त्यांची नावे असून ग्रॅण्ट रोडवरील हॉटेल बलवास येथे दोघेजण न्युझीलंड व वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या मोबाईलवर ते बेटींग घेत होते.
अंमली पदार्थ विक्री विरोधात धडाकेबाज कारवाया करणाऱ्या उपायुक्त लांडे यांना पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी शहरातील अनाधिकृत व बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करण्याची सूचना केली आहे. खेतवाडीतील बाराव्या गल्लीतील हॉटेल बलवासच्या रुम नं.२०३ मध्ये न्यूझीलंड व वेस्टइंडिज यांच्यातील सामन्यावर सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी निरीक्षक प्रविण कदम, शंशाक शेळके, सहाय्यक निरीक्षक उमेश सावंत, उपनिरीक्षक भोसलेसह हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी दोघेजण मोबाईलवर विविध ठिकाणाहून आलेले कॉल घेत बेटिगच्या नोंदी घेत होते. त्यांच्याजवळ ८ मोबाईल, एलसीडी टीव्ही व रोख ९ हजार ४७० रुपये सापडले. त्याचा मुख्य बुकींचा शोध घेण्यात येत आहे.
दहा दिवसात १४ कोटींचे बेटींगदोघा बुक्कीकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी १२ जूनपासून दहा दिवसामध्ये विश्वचषकातील विविध सामन्यावर तब्बल १४ कोटीचे बेटीग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये भारत-पाक सामन्यावर सर्वाधिक बेटीग घेण्यात आले होते. देशभरातील विविध ठिकाणाहून ते मोबाईलवर सट्टा घेत होते.