चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कमीच आहेत. बंगळुरू संघाची सुरुवातच निराशाजनक झाली. सलग सहा पराभवानंतर अखेरीस बंगळुरूची गाडी रुळावर आली खरी, परंतु त्याचा फार फायदा त्यांना होईल असे वाटत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कोहलीवर टीका होत आहे. त्यात बॉलिवूड अॅक्टर कमाल खान यानेही उडी घेतली आहे.
कमाल खानने ट्विट केले की,''विराट कोहली असभ्य वर्तन करतो. त्याचा संघही आयपीएलमध्ये तळावर आहे. दुसरीकडे महेंद्रसिंग दोनीचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतही धोनीच कर्णधार असायला हवा.''
कमाल खानने या ट्विटवरून कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी त्याने धोनी हा आताही सर्वोत्तम कर्णधार असल्याचे सांगितले. याआधीही कमाल खानने कोहलीवर बोचरी टीका केली आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कप संघ जाहीर केला त्यावेळी कमालने ही संघ उपांत्य फेरीतही पोहचू शकत नाही, असे विधान केले होते.