- स्वदेश घाणेकर
Inspirational Journey of Shamar Joseph : १२ महिन्यापूर्वी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले... त्यासाठी सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडली आणि आज बरोबर वर्षभरानंतर त्याने वेस्ट इंडिजला कसोटी क्रिकेटमधील ऐतिहासिक विजय मिळवून दिला. १९८८ नंतर वेस्ट इंडिजने गॅबा येथे ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. ३६ वर्षानंतर वेस्ट इंडिजने गॅबा कसोटी जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला २७ वर्षानंतर कसोटीत पराभवाची चव चाखायला लावली. जोश हेझलवूडचा त्रिफळा उडवल्यानंतर तो थेट बाऊंड्रीच्या दिशेने पळत सुटला... मागोमाग संपूर्ण विंडिजचा संघ होता... त्याच्या आनंदासमोर आत गगन ठेंगणे होते आणि हा विजय त्याच्यासह विंडीज क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे.
ऑस्ट्रेलियाचे 'गॅबा'मध्ये पुन्हा वस्त्रहरण! वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय, शामर जोसेफ ठरला हिरो
शामर जोसेफ ( Shamar Joseph) असे या नायकाचे नाव आहे... ऑस्ट्रेलियाचा शेवटचा फलंदाज बाद केल्यानंतर मैदानावर जल्लोष सुरूच होता, तेच ड्रेसिंग रुममध्ये महान खेळाडू कार्ल हूपर ढसाढसा रडला... कॉमेंट्री बॉक्समध्ये एडम गिलख्रिस्टने बाजूला बसलेल्या महान खेळाडू ब्रायन लाराला मिठी मारली... लाराच्या डोळ्यांत पाणी तरळले... हा विजय वेस्ट इंडिज क्रिकेटला नवी दिशा अन् आशा देणारा आहे, असे तो म्हणाला. एककाळ असा होता की विंडीज संघ वर्चस्व राखून होता, परंतु हा संघ जगाच्या मागे राहिला... मागच्या वर्षी तर त्यांना वन डे वर्ल्ड कपची पात्रताही मिळवता आली नव्हती.. अशा विंडीजसाठी आज नवा आशेचा किरण दिसला आहे.
"मिस्टर रॉडनी हॉग यांनी आम्हाला सांगितले की आम्ही 'दयनीय आणि हताश' आहोत. त्याच्या विधानाला आम्ही आमची प्रेरणा बनवले. मला आता त्यांना विचारायचे आहे, 'हा विजय तुमच्यासाठी पुरेसा आहे का का?'. आम्हाला जगाला दाखवायचे होते की आम्ही दयनीय नाही," असे सामन्यानंतर क्रेग ब्रॅथवेटने विधान केले. यावरून हे समजते की विंडीजचा संघ हा खिल्लीचा विषय झाला होता. पण, आज त्यांनी जगाला दाखवून दिले.

वेस्ट इंडिजच्या या विजयात २४ वर्षीय शामर जोसेफने सिंहाचा वाटा उचलला... काल मिचेल स्टार्कने टाकलेल्या भन्नाट यॉर्करवर जोसेफचा अंगठा दुखावला गेला. त्याला नीट चालताही येत नव्हते आणि त्यामुळे आज तो गोलंदाजी करेल असे कुणालाही वाटले नव्हते. पण, तो आला आणि मैदान मारले. ६८ धावांत ७ विकेट्स घेत त्याने ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकायला भाग पाडले... "माझ्या संघसहकाऱ्यांनी मला जे प्रोत्साहन दिले त्याबद्दल मला ओरडून सांगायचे आहे. मी मैदानावरही येणार नव्हतो. सकाळी डॉक्टरांनी मला फक्त माझ्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मैदानावर येण्यास सांगितले. त्याने माझ्या पायाच्या पायाला काहीतरी केले, त्यांनी काय केले ते मला माहित नाही, पण ही ट्रीक चालली,'' असे जोसेफ म्हणाला.
जोसेफचा संघर्षमयी प्रवास...
बराचरा; कॅरिबियनमधील एक गाव आणि इतके दुर्गम की न्यू ॲमस्टरडॅमहून तिथे जाण्यासाठी बोटीने सुमारे दोन दिवस लागतात. गावाची लोकसंख्या अंदाजे ३५० आहे आणि २०१८ मध्ये तिथे इंटरनेट पोहोचले... शामर जोसेफ तिथे लहानाचा मोठा झाला. मजूर म्हणून आणि नंतर १२ तासाच्या शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करू लागला. २०२३ मध्ये त्याने अचानक काम सोडण्याचा निर्णय घेतला आणि क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला...
शामरने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि स्टीव्हन स्मिथ सारख्या महान फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर बाद केले. पण आज त्याने गॅबामध्ये जे काही केले आहे ते इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. त्याने भविष्यातील पिढ्यांना दाखवून दिले पाहिजे की कसोटी क्रिकेट म्हणजे काय..
सामन्यानंतर तो म्हणाला, मी माझ्या बालपणीच्या अनुभवावरून असे म्हणू शकतो की आज जे आम्ही करून दाखवले त्यापुढे धावा, विकेट्स, मोठमोठे पगाराचे करार, ट्रॉफी याला महत्त्व नाही. तुम्ही आजच्या एका स्पेलने पिढ्यांना प्रेरणा दिली.