नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४७ वा वाढदिवस शुक्रवारी संपूर्ण देशाने साजरा केला. या वेळी सोशल मीडियावर सचिनवर शुभेच्छांचा वर्षांव झाला. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर उद्भवलेल्या संकटामुळे सचिनने आपला वाढदिवस साजरा केला नाही; मात्र त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कोणतीही कसर ठेवली नाही आणि त्यामुळेच फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सचिनमय झाल्याचे दिसले.
इंग्लंडविरुद्ध २००८ साली सचिनने झळकावलेल्या शतकाचे छायाचित्र बीसीसीआयने प्रसिद्ध केले. हे शतक सचिनच्या कारकिर्दीतील ४१वे शतक होते आणि ते त्याने मुंबई २६/११च्या आतंकवादी हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांना समर्पित केले होते. ‘मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ४७ वर्षांचा होतोय. इंग्लंडविरुद्ध २००८ साली खेळलेल्या शानदार खेळीच्या आठवणींना उजाळा देतोय.’ वीरेंद्र सेहवागने २००७ आणि २०११ विश्वचषक स्पर्धेची छायाचित्रे पोस्ट करताना लिहिले की, ‘ ही महान व्यक्ती फलंदाजी करीत असताना भारतात वेळही थांबवून ठेवत असे. कठीण प्रसंगात मनोधैर्य टिकवून ठेवणे आणि अनेक अडचणींनंतरही विजय मिळविणे.’ ही सचिनपासून मिळालेली प्रेरणा आहे.’
कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, बालपणीचा मित्र विनोद कांबळी, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, अजिंक्य रहाणे, ख्रिस गेल यांनीही सचिनला शुभेच्छा दिल्या. (वृत्तसंस्था)
सचिनची शारजातील खेळी सर्वोत्तम
दुबई : सचिन तेंडुलकरच्या ४७ व्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांतील त्याच्या सर्वोत्तम खेळीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यात शारजामध्ये केलेली १४३ धावांची खेळी सर्वोत्तम ठरली. सचिनने १९९८ मध्ये तिरंगी मालिकेत २२ एप्रिल रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ही खेळी केली होती.