नवी दिल्ली : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार साकिबुल गनी यांच्या स्फोटक शतकाच्या जोरावर बिहारने बुधवारी विजय हजारे करंडक एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत अरुणाचल प्रदेशविरुद्ध ५० षटकांत विश्वविक्रमी ५७४ धावा उभारल्या. अ श्रेणी (लिस्ट ए) क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
प्लेट गटातील सामन्यात बिहारच्या फलंदाजांनी अरुणाचल प्रदेशच्या कमकुवत गोलंदाजी आक्रमणाची अक्षरशः चिंधड्या उडवल्या. गनीने अवघ्या ४० चेंडूंमध्ये १० चौकार व १२ षटकारांसह नाबाद १२८ धावांची खेळी केली. त्याने केवळ ३२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये हे भारताकडून झळकावलेले सर्वात वेगवान शतक ठरले. याआधी हा विक्रम पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगच्या नावावर होता. त्याने २०२४ मध्ये याच संघाविरुद्ध ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
वैभवने ३६ चेंडूंत शतक ठोकताना ८४ चेंडूंमध्ये १६ चौकार व १५ षटकारांसह १९० धावा कुटल्या. तो लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वांत युवा शतकवीरही ठरला. या दोघांना यष्टिरक्षक आयुष लोहारुकानेही साथ दिली आणि ५६ चेंडूंमध्ये ११ चौकार व ८ षटकारांसह ११६ धावांची खेळी केली. बिहारने डावात एकूण ४९ चौकार आणि तब्बल ३८ षटकार ठोकले. बिहारने लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा तामिळनाडूचा विक्रम मोडला. नोव्हेंबर २०२२ मध्ये तामिळनाडूने अरुणाचल प्रदेशविरुद्धच २ बाद ५०६ धावा केल्या होत्या. बिहारच्या या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अरुणाचल प्रदेशचा डाव ४२.१ षटकांत केवळ १७७ धावांत संपुष्टात आला. बिहारने ३९७ धावांनी बाजी मारली.
इशान किशनचे स्फोटक शतक ठरले व्यर्थ
स्टार यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन यानेही या स्पर्धेत लक्षवेधी फटकेबाजी केली. मात्र, त्याच्या स्फोटक शतकानंतरही झारखंडला कर्नाटकविरुद्ध पराभव पत्करावा लागला. इशानने मधल्या फळीत खेळताना ३३ चेंडूंमध्ये शतक झळकावत ३९ चेंडूंत ७ चौकार व १४ षटकारांसह १२५ धावा केल्या. हे लिस्ट ए क्रिकेटमधील चौथे वेगवान शतक ठरले. या जोरावर झारखंडने ५० षटकांत ९ बाद ४१२ धावा उभारल्या.
परंतु, यानंतर कर्नाटककडून देवदत्त पडिक्कलने शानदार शतक ठोकत ११८ चेंडूंत १४७ धावा काढताना १० चौकार व ७ षटकार मारले.
कर्णधार मयांक अग्रवाल (३४ चेंडूंत ५४ धावा) आणि अभिनव मनोहर (३२ चेंडूंत नाबाद ५६) यांनीही आक्रमक अर्धशतक झळकावले. या जोरावर कर्नाटकने ४७.३ षटकांमध्येच ५ बाद ४१३ धावा करत बाजी मारली. त्यांच्या या खेळीमुळे झारखंडने प्रथम फलंदाजी करताना नऊ विकेट्सवर ४१२ धावांचा भक्कम डोंगर उभा केला.
‘लिस्ट ए’ मधील सर्वात वेगवान शतक
२९ चेंडू : जेक फ्रेझर-मॅकगर्क (आस्ट्रेलिया) : दक्षिण ऑस्ट्रेलिया वि. टास्मानिया
३१ चेंडू : एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका) : द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज
३२ चेंडू : साकिबुल गनी (भारत) : बिहार वि. अरुणाचल प्रदेश
३३ चेंडू : इशान किशन (भारत) : झारखंड वि. कर्नाटक
३५ चेंडू : अनमोलप्रीत सिंग (भारत) : पंजाब वि. अरुणाचल प्रदेश