Join us  

पाकिस्तानला मोठा धक्का; बांगलादेशनेही सामना खेळण्यास दिला नकार

बांगलादेश क्रिकेट मंडळाने आता पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त पुढे येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 9:57 PM

Open in App

मुंबई : पाकिस्तानला सध्या फार मोठा धक्का बसला आहे. कारण बांगलादेश क्रिकेट मंडळाने आता पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त पुढे येत आहे.

पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ बांगलादेशने आपल्या देशात कसोटी सामना खेळावा, यासाठी प्रयत्नशील होते. पण आता पाकिस्तानच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. कारण पाकिस्तामध्ये आम्हाला जास्त दिवस क्रिकेट खेळायचे नाही, असे बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.

बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी याबाबत सांगितले की, " सध्याच्या घडीला पश्चिम आशियामधील वातावरण फारसे चांगले नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेट खेळून आम्हाला खेळाडूंच्या बाबतीत कोणतीही जोखीम घ्यायची नाही. पाकिस्तानमध्ये आम्ही कसोटी सामना खेळावा, अशी त्यांच्या क्रिकेट मंडळाची इच्छा आहे. पण सध्याचे पाकिस्तानमधील वातावरण जास्त काळ राहण्यासाठी पोषक नाही, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्हाला पाकिस्तानमध्ये जास्त काळ व्यतित करायचा नाही." 

बांगलादेशने यापूर्वी पाकिस्तानमध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळण्याचे मान्य केले आहे. पण बांगलादेशने त्यानंतर कसोटी सामनाही खेळावा, यासाठी पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ प्रयत्न करत आहे. बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने सध्यातरी या गोष्टीला होकार दिलेला नाही. पण यानंतर दोन्ही देशांचे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आयसीसीला भेट देणार आहेत. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याबरोबर बैठकीनंतर यावर योग्य तो तोडगा निघेल, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :बांगलादेशआयसीसीपाकिस्तान