India vs Pakistan, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू महिन्याभरापेक्षा जास्त वेळ शिल्लक आहे. पण त्याआधीच पाकिस्तानला एक मोठा धक्का बसला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे तरीही त्यांना बऱ्याच गोष्टींवरून ट्रोल व्हावं लागत आहे. तशातच पाकिस्तानी संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. ही बातमी माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) दिली आहे. त्याने एका मुलाखतीत खुलासा केला की तुफान फॉर्मात असलेला पाकिस्तानी सलामीवीर सैम अयुब (Saim Ayub) दुखापतमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे जवळपास अशक्य आहे. शाहिद आफ्रिदीने एका मुलाखतीत सांगितले की, त्याने बुधवारी रात्री सैम अयुबला फोन केला होता आणि त्यानंतर त्याला समजले की हा खेळाडू कमीत कमी ३ आठवडे विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर त्याची रिकव्हरी सुरू होईल.
सैम अयुब चॅम्पियन्स ट्रॉफीला का मुकणार?
शाहिद आफ्रिदीने सैम अयुबबाबत दिलेल्या वृत्तावरून असे दिसते आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो फिट होणे अशक्य आहे. जर सैम अयुब खेळला नाही तर पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असेल. कारण या खेळाडूने मागील तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये २ शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या कठीण खेळपट्ट्यांवर या खेळाडूने शानदार फलंदाजी केली आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो संघासाठी मॅचविनर ठरू शकला असता. परंतु त्याच्या दुखापतीमुळे आता थोडी चिंता निर्माण झाली आहे.
सैम अयुबच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर या खेळाडूने ९ सामन्यात ६४.३७ च्या सरासरीने ५१५ धावा केल्या आहेत. अयुबच्या नावावर ३ शतके आहेत आणि एक अर्धशतकही आहे. त्याचा स्ट्राईक रेटही १०० पेक्षा जास्त आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशा स्फोटक सलामीवीराची पाकिस्तानला खूप उणीव भासेल हे स्पष्ट आहे.
सैम अयुबची जागा फखर जमान घेणार?
जर सैम अयुब तंदुरुस्त नसेल तर पाकिस्तानी संघ पुन्हा एकदा फखर जमानला सलामी देऊ शकतो. कारण त्यांचा दुसरा सलामीवीर अब्दुल्ला शफीकचा फॉर्म खूपच खराब आहे. त्याला संघातूनच वगळण्यात आले आहे. फखर झमानची जमेची बाजू म्हणजे तो दुबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लीग टी-20 स्पर्धेत खेळत आहे. त्याला तेथील परिस्थितीची अंदाज आहे. २३ मार्चला दुबईत पाकिस्तानला टीम इंडियाविरुद्ध सामना खेळायचा आहे.
Web Title: Big shock for Pakistan Bad news came before the Champions Trophy Shahid Afridi gave information
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.