भारतीय संघाचा स्टार फिरकी अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनी, सेहवागप्रमाणेच त्यालाही त्याचा शेवटचा सामना खेळता आलेला नाही. फिरकीपटू म्हणूनच नाही तर त्याने काही शतकेही नावावर केली आहेत. अशा या अष्टपैलू खेळाडूने महिनाभरापूर्वीच निवृत्ती घेण्याचे मनाशी पक्के केले होते. ऑस्ट्रेलियासोबतच्या दुसऱ्या करोटीत त्याला खेळविण्यात आले होते. परंतू, तिसऱ्या कसोटीत त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. पुढचे दोन सामने देखील त्याला खेळविण्यात येणार नव्हते. यामुळे त्याने गाबा कसोटी संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासोबत येत निवृत्ती जाहीर करून टाकली.
अश्विनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे नव्हते. यापूर्वीही अश्विनवर प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेतल्याची वेळ आली होती. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड झाली तेव्हाच त्याने संघ व्यवस्थापनाला याबाबत स्पष्ट केले होते. जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, त्याची गरज उरली नाही तर निवृत्ती घेतलेली चांगली असे अश्विनने स्पष्ट केले होते.
भारतीय संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मायदेशात मालिका खेळली होती. यामध्ये किवी संघाने 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. या पराभवानंतरच अश्विनने नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच निवृत्तीची योजना आखली होती. भारतीय संघात आपली जागा उरलेली नाही हे अश्विन समजून चुकला होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्थ कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्मालाही त्याने हाच प्रश्न विचारला होता. संघात माझी गरज नसेल तर मी निवृत्ती घेईन, असे तो म्हणाला होता. पर्थमधील पहिल्या कसोटीत अश्विनला खेळविण्यात आले नाही तेव्हाच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यात रोहित कप्तानपदी आला आणि त्याला पिंक बॉलसाठी खेळण्याची गळ घातली. रोहितने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुढील टेस्ट १० महिन्यांनी, संधी मिळाली तर मिळाली...भारतीय संघाची पुढील टेस्ट पुन्हा भारतात दहा महिन्यांनी असणार आहे. त्यापूर्वी भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, परंतू तिथे सपाट खेळपट्ट्यांमुळे अश्विनला संधी मिळणार नाही. तसेच ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या टेस्ट सामान्यांत अश्विनला संधी मिळेल की नाही याची शाश्वती नाही, असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले.