ठळक मुद्दे2019 आयपीएलमध्ये होणार बदलविश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंना मिळणार विश्रांती18 डिसेंबरला होणार निर्णय
मुंबईः पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाला पुरेसा वेळ मिळणार आहे. 2019ची आयसीसी विश्वचषक स्पर्धा 30 मे पासून सुरू होणार आहे. ही बाब लक्षात घेत पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) बरेच फेरफार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीएलला सुरुवात होते. मात्र, विश्वचषकाचे वेळापत्रक समोर ठेवताना आयपीएलला 23 मार्चपासून सुरुवात करण्याचा विचार सुरू आहे.
हैदराबादमध्ये बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक झाली. या बैठकीला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे उपस्थित होते. यावेळी भारताच्या आगामी दौऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेबाबतची चर्चाही करण्यात आली. या बैठकीत आयपीएलला मार्च महिन्यात सुरुवात करावी अशी विनंती करण्यात आली.
विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघातील संभाव्य खेळाडूंना फ्रँचाईझीनी पुरेशी विश्रांती द्यावी यावरही चर्चा झाली. मात्र, हे फ्रँचाईझींच्या सहमतीवर अवलंबून आहे. तसे न झाल्यास बीसीसीआय आयपीएलचा पुढील हंगाम मार्चच्या अखेरीस सुरुवात करण्याची शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त 2019च्या निवडणुका लक्षात घेता आयपीएल भारतात खेळवावी की अन्यत्र याचाही विचार सुरू आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर घेतला जाईल. अशा परिस्थितीत आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्याची शक्यता अधिक आहे. जयपूरमध्ये 18 डिसेंबरला होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत याबाबतचे निर्णय घेतले जातील.