Big Blow to LSG, IPL 2025: आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. पहिला सामना २२ मार्चपासून होणार आहे. पण त्याआधी अनेक संघांचे काही महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याच्या बातम्या येत आहेत. दुखापतींचा सर्वाधिक फटका लखनौ सुपरजायंट्स ( Lucknow Super Giants ) संघाला बसला आहे. मोहसिन खान आणि आवेश खान या दोघांच्या फिटनेसबाबत संघ चिंतेत आहे. त्यातच मयंक यादवदेखील दुखापतीमुळे हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता आणखी एका वेगवान गोलंदाजाला दुखापतीने ग्रासले आहे आणि तो खेळाडू पहिल्या काही सामन्यांत उपलब्ध नसेल असे बोलले जात आहे.
टीओआयच्या रिपोर्टनुसार, आकाश दीप हा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याची माहिती आहे. त्याची दुखापत गंभीर असून तो इतक्यात तंदुरूस्त होईल अशी शक्यता नाही. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात आकाश दीपला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले होते. पण त्याची कामगिरी चांगली असल्याने त्याला लखनौ संघाने यंदाच्या हंगामासाठी ८ कोटींची बोली लावून खरेदी केले. आता मात्र त्याच्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार त्याची दुखापत गंभीर आहे. अशा परिस्थितीत लखनौ संघाचे किती वेगवान गोलंदाज सध्या खेळण्यासाठी उपलब्ध आहेत, याबाबत स्पष्टता देण्यात आलेल नाही.
लखनौला मिळालाय नवा कर्णधार
भारतीय संघाचा अनुभवी विकेटकिपर रिषभ पंत यंदा लखनौ संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. गेल्या वर्षापर्यंत पंत हा दिल्लीचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने चांगली कामगिरी केली होती. पण पंतला यंदाच्या हंगामात दिल्लीने करारमुक्त केले. त्याच्यावर मोठी बोली लागणार याची साऱ्यांनाच कल्पना होती. त्यानुसार पंतला संघात घेण्यासाठी लखनौने तब्बल २७ कोटींची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.