आयपीएल २०२५ स्पर्धेतील उर्वरित सामने उद्यापासून खेळले जाणार आहेत. मात्र, त्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का लागला आहे. संघाचा आघाडीचा गोलंदाज मिचेल स्टार्कनंतर आता स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिस यानेही भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीसीसीआयने १३ मे २०२५ रोजी या स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करून उर्वरित सामने खेळवले जाणार असल्याची घोषणा केली. परंतु, ही स्पर्धा सुरू होण्याआधीच दिल्लीच्या अडचणीत भर पडली.
आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दिल्लीला पुढील सामने जिंकणे आवश्यक असताना स्टार्क आणि फाफ डू प्लेसिसने संघाची साथ सोडली. दिल्लीचा संघ गुणतालिकेत १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. दिल्लाने आणखी तीन सामने खेळायचे आहेत. गुजरातचा संघ गुणतालिकेत १६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर, आरसीबीचा संघ (१६ गुण) दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाबचा संघ (१५ गुण) तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स (१४ गुण) चौथ्या स्थानावर आहे.
दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना तीन पैकी दोन सामने जिंकायचे आहेत. अशातच मिचेल स्टार्क आणि फाफ डू प्लेसिसने आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे. आयपीएल २०२५ मध्ये फाफ डू प्लेसिसने सहा सामन्यात दोन अर्धशतकांच्या मदतीने एकूण १६८ धावा केल्या आहेत. दुखापतीमुळे त्याला पाच सामन्यांना मुकावे लागले.