नवी दिल्ली : भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी विश्वचषक स्पर्धेपूर्वी अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रयोग करणे सुरू ठेवणार असल्याचे संकेत देताना मंगळवारी सांगितले की, ‘भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारी होणाऱ्या लढतीत प्रत्येक पर्यायाचा शोध घेण्यास प्रयत्नशील राहील.’
पाचव्या व निर्णायक लढतीच्या पूर्वसंध्येला पत्रकारांसोबत बोलताना अरुण म्हणाले,‘विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची रूपरेषा तयार आहे. पण आम्ही या लढतीत प्रत्येक पर्यायाचा वापर करण्यास प्रयत्नशील असू. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या क्रमांकावर विविध खेळाडूंची चाचणी घेत आहोत.’
गेल्या सामन्यात कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याबाबत अरुण म्हणाले, ‘विराटने तिसऱ्या क्रमांकावर शानदार फलंदाजी केली, पण ही एक संधी आहे. चाचणी घेतली तर विविध पर्याय मिळतात.’ विश्वचषकापूर्वी काही विभागात सुधारणा करण्याची गरज असून, त्यातील एक म्हणजे गोलंदाजी असल्याचे अरुण यांनी स्पष्ट केले.
विजय शंकरबाबत अरुण म्हणाले, ‘विजयचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्याने कुठल्याही क्रमांकावर शानदार फलंदाजी केली आहे. आम्ही त्याला चौथ्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर संधी दिली. त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्याच्या गोलंदाजीतही सुधारणा झाली आहे. फलंदाजीतील आत्मविश्वास त्याच्या गोलंदाजीत दिसते. सुरुवातीला तो १२०-१२५ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करीत होता, पण आता तो १३० च्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्याच्या गोलंदाजीमध्ये आत्मविश्वास झळकत असून, संघासाठी ही सकारात्मक बाब आहे.’ (वृत्तसंस्था)
पंतची धोनीशी तुलना नको!
अरुण यांनी यष्टिरक्षक रिषभ पंतची पाठराखण करताना युवा खेळाडूची तुलना दिग्गज महेंद्रसिंग धोनीसोबत होणे योग्य नसल्याचे म्हटले. धोनी महान खेळाडू असून यष्टीमागे त्याची कामगिरी शानदार आहे. विराटला ज्यावेळी गरज भासते त्यावेळी तो धोनीची मदत घेतो. संघावर धोनीचा प्रभाव आहे.’ केदार जाधवच्या गोलंदाजीबाबत अरुण म्हणाले, ‘जर पाच नियमित गोलंदाजांनी आपले काम चोख बजावले तर त्याची गरज भासणार नाही. केदारने अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. ज्यावेळी त्याची गरज नसेल त्यावेळी तो गोलंदाजी करणार नाही, असे आम्ही गोलंदाजी विभागाला सांगतो.’