साऊथम्पटन : ‘इंग्लंडला त्यांच्या मैदानावर हरविणे सोपे नाही. चौथ्या दिवशी केलेले सांघिक प्रयत्न फळल्यामुळे विदेशी भूमीत गत १३ वर्षांत पहिल्या कसोटीत विजय मिळविणे सोपे झाले. हा आपल्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट विजय ठरल्याचे,’ मत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने विजयानंतर व्यक्त केले.
विंडीजने ३० धावात पाच फलंदाज बाद करीत यजमान संघाची शनिवारी चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ८ बाद २८४ अशी अवस्था केली होती. अखेरच्या क्षणी वेगवान मारा निर्णायक सिद्ध झाला. त्यानंतर काल रविवारी जर्मेन ब्लॅकवूडच्या ९५ धावांच्या झंझावाती खेळीमुळे विंडीजने इंग्लंडवर चार गड्यांनी सरशी साधून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.
‘चौथ्या दिवशी संघाने सांघिक प्रयत्न केले. यात गोलंदाजांचीच नव्हे तर क्षेत्ररक्षकांची भूमिकादेखील निर्णायक ठरली. सर्वच गोलंदाजांनी ऊर्जावान कामगिरी केली. स्टोक्स आणि क्राऊले फलंदाजी करत असताना सामना आमच्या हातून निसटत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. आम्ही विजयाच्या निर्धाराने येथे आलो असल्याने विजयाचा विश्वास कायम ठेवून खेळलो. हा विजय विशेष आहे,’ असे होल्डरने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
तो म्हणाला, ‘आम्ही अनेक वाईट दिवस पाहिले असल्याने नेमके कुठल्यावेळी वर्चस्व गाजवायचे याची कल्पना आली आहे. सामना जिंकण्यासाठी स्थिरावलेली जोडी फोडणे गरजेचे आहे हे ओळखून अल्जारी जोसेफला मारा करण्यासाठी पाचारण केले. त्याने अखेर भागीदारी खंडित केली. याशिवाय जोस बटलर आणि डॉम बेस यांच्याकडूनही धोका होता, हे ओळखून त्यांचाही अडथळा दूर केला.’
‘ज्यो रूटच्या अनुपस्थितीचा लाभ घेत आम्ही यजमानांच्या अनुभवहीन फलंदाजीचा लाभ घेतला. याआधी मालिकेत चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरत होतो. येथे पहिल्या सामन्यात मिळालेल्या या विजयाला मोठे महत्त्व असल्याचे,’ होल्डरने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
पहिल्या डावातील चूक पराभवास कारणीभूत-स्टोक्स
साऊथम्पटन : ‘आमच्याकडून चूक झाली. ती का व कुठे झाली हेदेखील माहीत आहे. पहिल्या डावात धावडोंगर उभा करण्यासाठी चांगली फलंदाजी आवश्यक आहे. परिस्थिती कशी आहे, याला फारसे महत्त्व नाही. आम्ही ६०-७० धावा अधिक केल्या असत्या तर चित्र वेगळे असते,’ असे मत इंग्लंडचा हंगामी कर्णधार बेन स्टोक्स याने पराभवानंतर व्यक्त केले.नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय खेळपट्टी ओली असताना फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यजमानांचा पहिला डाव २०४ धावात आटोपला. जेसन होल्डरच्या माºयापुढे मधली फळी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. दुसºया दिवशी चौथ्या डावातही भक्कम स्थितीत असताना मधल्या फळीतील फलंदाज लाभ घेण्यात आपयशी ठरले होते. तो म्हणाला, ‘आम्ही अंतिम एकादश निवडण्याबाबत खेद व्यक्त केला.’
ब्रॉडला बाहेर ठेवण्याचे समर्थन
पराभवानंतरही वेगवान गोलंदाज ख्रिस ब्रॉड याला बाहेर ठेवण्याचे स्टोक्सने समर्थन केले. अंतिम एकादशमधून वगळल्यामुळे ब्रॉडने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत राग आणि निराशा व्यक्त केली होती. हताश झालेल्या ब्रॉडने करिअरविषयी प्रश्न उपस्थित केला होता. यावर स्टोक्स म्हणाला, ‘शंभराहून अधिक कसोटी खेळणाºया खेळाडूला असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र पहिल्या कसोटीसाठी निवडलेल्या अंतिम एकादशचा मी बचाव करतो.’