Join us

रणनीतीनुसार खेळ करणे अव्वल संघाचे लक्षण

राजकोटमध्ये घाम गाळावा लागेल अशी विराटच्या नेतृत्वाखालील संघाला अपेक्षा होती, पण विंडीज संघ लढत देण्यात अपयशी ठरला. यजमान संघाने खेळाच्या सर्वच विभागात सरस कामगिरी करीत वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 02:46 IST

Open in App

- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर विंडीज संघाने नांगी टाकल्यामुळे भारतीय संघाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. राजकोटमध्ये घाम गाळावा लागेल अशी विराटच्या नेतृत्वाखालील संघाला अपेक्षा होती, पण विंडीज संघ लढत देण्यात अपयशी ठरला. यजमान संघाने खेळाच्या सर्वच विभागात सरस कामगिरी करीत वर्चस्व गाजवले.विराट कोहलीचे कसोटी शतक झाकोळले गेल्याचे अभावानेच घडते. विराटने लौकिकाला साजेशी खेळी केली, पण पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या पृथ्वी शॉने मात्र लक्ष वेधले. पदार्पणात शतकी खेळी केल्यामुळे आनंद झाला. युवा पृथ्वीने दडपण न बाळगता सर्वोच्च पातळीवरही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळत असल्याप्रमाणे आक्रमक खेळ केला. गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा त्याचा पवित्रा शानदार होता. लहान वयातही त्याला त्याच्या खेळाचा चांगली माहिती आहे. भविष्यात फलंदाज म्हणून तो अधिक परिपक्व होईल. तो ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे संकेत मिळत आहेत.रवींद्र जडेजाची खेळीही सुखावणारी होती. त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मोठ्या खेळी केलेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अर्धशतके झळकावलेली आहे. पण, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या शतकाचे महत्त्व काही वेगळेच असते. त्यामुळे त्याचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल. ही शतकी खेळी त्याच्या गृहमैदानावर साकारल्या गेल्यामुळे त्याच्यासाठी विशेष आहे. गेले दोन आठवडे या अष्टपैलू खेळाडूसाठी व्यस्त होते.प्रतिस्पर्धी कुणीही असले तरी आपल्या रणनीतीनुसार खेळ करणे हे अव्वल संघाचे लक्षण असते. विंडीजविरुद्ध भारतीय संघाने सुरुवातीपासून वर्चस्व कायम राखले. पहिल्या डावात वेगवान गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. खेळपट्टीकडून विशेष मदत नसतानाही अश्विन व जडेजा यांनी बळी घेतल्याचे आश्चर्य वाटत नाही, पण कुलदीप यादवची कामगिरी शानदार ठरली. पहिल्या डावात त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. लॉर्ड््स कसोटीमुळे त्याच्या मनोधैर्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. पहिल्या डावात त्याच्याविरुद्ध धावा फटकावल्या जात असतानाही विराटने त्याला गोलंदाजीमध्ये कायम ठेवले. त्यामुळे कुलदीपच्या यशाचे श्रेय विराटला द्यायलाच हवे. कुलदीपने दुसºया डावात शानदार मारा केला व कसोटीमध्ये प्रथमच पाच बळी घेतले. भविष्यात त्याच्याकडून या कामगिरीची अनेकदा पुनरावृत्ती होईल, असा मला विश्वास आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज