Join us  

#BestOf2018 : जोश नवा, जल्लोष नवा; भारतीय संघात नवनिर्माणाचे वारे...!

भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत नवा अध्याय लिहीला... ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच प्रेक्षकांसमोर पराभूत करण्याचा पराक्रम भारतीय खेळाडूंनी केला.

By स्वदेश घाणेकर | Published: December 30, 2018 1:44 PM

Open in App

भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत नवा अध्याय लिहीला... ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच प्रेक्षकांसमोर पराभूत करण्याचा पराक्रम भारतीय खेळाडूंनी केला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी पराभूत करण्याची ही भारताची पहिलीच वेळ नसल्रे तरी हा विजय खूप खास आहे. 41 वर्षानंतर प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर एकाच मालिकेत दोनवेळा पराभवाची चव चाखवली. ऑसी गोलंदाजांपेक्षा भारताच्या गोलंदाजीची धार अधिक धारधार राहिली. भारताने या विजयासह 2018 सालचा विजयी निरोप घेतला नाही, तर नवीन वर्षांत आणखी जोमाने कामगिरी कतण्याचा आत्मविश्वास कमावला आहे.. जरा मागे वळून पाहा...2018 ची सुरुवात कशी झाली ते. दक्षिण आफ्रिकेवत गेलेला भारतीय संघ आठवा. वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवाचे हे सत्र दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिले आणि आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताने तिसरा सामना जिंकून लाज वाचवली, पण मालिका गमावण्याच्या ओझाची पहिली वीट भारतीय खेळाडूंच्या डोक्यावर आली. मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी जिंकून आफ्रिकेतील पराभव विसरण्याचा प्रयत्न संघाकडून झाला. मात्र इंग्लंड दौऱ्यात पुन्हा तोच अनुभव आला. भारताला 4-1 अशी हार मानावी लागली. या दौऱ्यातील काही सामने तर आपण हातचे घालवले. अति घाई संकटात नेई... तसाच प्रसंग भारतीय संघाने ओढावून घेतला. त्यान पुन्हा मायदेशात वेस्ट इंडिज सारख्या दुबळ्या संघावर मर्दुमकी गाजवून ऑस्ट्रेलिया आपण आलो. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करावे तितके कमीच.. विशेषतः गोलंदाजी विभागाचे. आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यातही गोलंदाजांनी त्यांची कामगिरी चोख बजावली होती. फलंदाजांचे अपयश भारताच्या पराभवास कारणीभूत ठरले होते. परदेशात भारतीय गोलंदाजांनी 2018 मध्ये एकूण 205 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे एकेकाळी आपली कमकुवत असलेली बाजू मजबूत झाली आहे. त्यांच्याच आधारावर आपण परदेशात यश मिळवत आहोत.

जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार व उमेश यादव ही जलदगती गोलंदाजांची फळी भारताचा मारा धारधार करणारी आहे. कुलदीप यादव व युझवेंद्र चहल हे उत्तम पर्याय भारताला मिळाले आहेत, परंतु आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूची उणीव भरून काढतो. तेच पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल व हनुमा विहारी हा युवा जोश भारताच्या ताफ्यात दाखल झाला आहे. सरते वर्ष हे विराटमय होते, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. एकट्या विराट कोहलीवर अवलंबून राहणे भारतासाठी फायद्याचे नाही, हे काही सामन्यांतील निकालाने दिसून आले. पण, आता अन्य फलंदाजांनाही सूर गवसला आहे आणि ही भारतासाठी चांगली बाब आहे. 

विजयाची ही मालिका येथेच थांबणारी नाही, असा आत्मविश्वास कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटी सामन्यानंतर बोलून दाखवला. भारतीय संघाच्या कामगिरीतून तो खरा ठरेल, अशी आशा निर्माण झाली आहे. भारतीय संघाने सरत्या वर्षाचा विजयाने निरोप घेतला आणि 2019मध्ये याच जोशात आणखी ऐतिहासिक विजय मिळवण्याचा निर्धार विराटसेनेनं केला आहे. 2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपच्या दृष्टीने हा निर्धार भारतीय क्रिकेट चाहत्यांना जल्लोषाच्या अनेक संधी देणारा ठरावा, हीच अपेक्षा...

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीजसप्रित बुमराहमोहम्मद शामीइशांत शर्मा