Bernard Julien Passes Away : वेस्ट इंडिजच्या संघाकडून पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा खेळून ती जिंकत चॅम्पियन ठरलेला दिग्गज काळाच्या पडद्याआड गेला आहे. वेस्ट इंडिजचे अष्टपैलू बर्नाड ज्युलियन यांचे त्रिनिदादमधील उत्तरेला वसलेल्या वालसेन शहरात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते ७५ वर्षांचे होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत संघाला जेतेपद मिळवून देणारी उपयुक्त कामगिरी
१९७५ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ५ सामन्यात या दिग्गजाने १० विकेट्स आणि ७१ धावा करत संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. यात साखळी फेरीच्या लढतीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्यांनी ४ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय अंतिम आणि निर्णायक सामन्यात एक विकेट आणि ३७ चेंडूत २६ धावांची उपयुक्त खेळी त्यांच्या भात्यातून पाहायला मिळाली होती.
सर क्लाइव्ह लॉयड यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
वेस्ट इंडिजचे महान कर्णधार सर क्लाइव्ह लॉयड यांनी बर्नार्ड जूलियन (Bernard Julien Died) यांच्या आठवणीला उजाळा दिलाय. ते म्हणाले की, हा अष्टैपलू मैदानात नेहमीच आपले शंभर टक्के द्यायचा. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हींमध्ये तो भरवशाचा खेळाडू होता. क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत त्याने अनेकांना आनंदी क्षण दिले. मला अजूनही आठवतंय की, लॉर्ड्सच्या मैदानावर आम्ही पहिला सामना जिंकलो त्यावेळी तो बराच वेळ ऑटोग्राफ देत होता, या आठवणींना उजाळा देत सर क्लाइव्ह लॉयड यांनी आपल्यासोबत खेळलेल्या आणि वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या सवंगड्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
कशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकिर्द
बर्नाड ज्युलियन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बर्नाड ज्युलियन या दिग्गजाने २४ कसोटी, १२ वनडेत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधीत्व केले. यात कसोटीत ५० विकेट्स आणि ८६६ धावांच्या कामगिरीसह वनडेत त्यांनी १८ विकेट आणि ८६ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.