Join us

Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."

Bengaluru Stampede, IPL 2025: RCBने आयपीएल जिंकल्यानंतर ४ जूनला झालेल्या विजयी मिरवणुकीत ११ जणांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:35 IST

Open in App

RCB Bengaluru Stampede, IPL 2025: पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर झालेल्या विजयोत्सवामुळे झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या व्यवस्थापनालाच जबाबदार धरण्यात आले आहे. ४ जून रोजी या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण लवादाने (CAT) म्हटले आहे की, बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी आरसीबी प्रथमदर्शनी आरोपी असल्याचे दिसून येते. शिवाय, न्यायाधिकरणाने स्पष्टपणे म्हटले आहे की कमी वेळात अचानक सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी पोलिसांकडे अलाद्दीनचा जादूचा दिवा नव्हता.

'लाइव्ह लॉ'च्या वृत्तानुसार, लवादाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आरसीबीने कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेतली नाही. यामुळेच ४ जून २०२५ रोजी शहरात ३ ते ५ लाख लोकांचा जमाव जमला होता. या घटनेनंतर, गर्दी व्यवस्थापनासाठी राज्य सरकारवर जोरदार टीका झाली. RCBच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमभोवती लाखो लोकांची गर्दी जमली होती. पण याची पूर्वकल्पना ठराविक वेळेआधी संबंधितांना दिली गेली नसल्याने हा गोंधळ झाला.

RCB ने अचानक घोषणा केल्याने 'तमाशा' झाला...

ट्रिब्युनलने निरिक्षण नोंदवले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा फारच झटपट करण्यात आली होती, ज्यामुळे प्रशासनाला सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. ट्रिब्युनलने म्हटले आहे की, RCB ने आगाऊ परवानगी न घेता अचानक तमाशा करून टाकला. त्यादिवशी पोलिस विधानसभेत होणाऱ्या राज्य सरकारच्या कार्यक्रमात आधीच व्यस्त होते. त्यामुळे त्यांना दोष देता येणार नाही.

पोलिसांकडे जादूचा दिवा नाहीये...

इतक्या कमी वेळात इतक्या मोठ्या गर्दीला हाताळण्याची अपेक्षा कायदा अंमलबजावणी संस्थांकडून करता येणार नाही, यावर न्यायाधिकरणाने भर दिला. लवादाने स्पष्टपणे म्हटले की, पोलिसदेखील माणूसच आहेत. ते 'देव' नाहीत, जादूगारही नाहीत आणि त्यांच्याकडे 'अलादीनच्या दिव्या' सारखी जादुई शक्तीही नाही. न्यायाधिकरण लवादाने वरिष्ठ IPS अधिकारी विकास कुमार यांच्याविरुद्ध कर्नाटक सरकारचा निलंबनाचा आदेशही रद्द केला. चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.

टॅग्स :बंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरबेंगळूरइंडियन प्रिमियर लीग २०२५