Join us

RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर

विराट ना कर्णधार, ना संघमालक... मग किंग कोहलीची चूक काय? अहवालात कारण स्पष्टपणे नमूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:37 IST

Open in App

बेंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला आहे. ३ जून रोजी IPL 2025 चॅम्पियन झाल्यानंतर, RCBने ४ जूनला अतिशय घाईघाईने आणि कसलेही नियोजन न करता विजयी परेड आयोजित केली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४७ जण जखमी झाले. सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या या अहवालात अनेक प्रकारच्या गंभीर चुकांचा उल्लेख आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या संपूर्ण घटनेत विराट कोहलीचे नावही समोर आले आहे.

विराट कोहलीचे नाव का आले?

या अहवालात विराट कोहलीचे नाव देण्यामागे एक विशेष कारण देखील समोर येत आहे. ४ जून रोजी बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT) RCBला जबाबदार धरले. RCB ने अचानक सोशल मीडियावर पोलिसांच्या परवानगीशिवाय विजय परेडची घोषणा केली, ज्यामुळे लाखो लोकांची गर्दी झाली. चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला. याच अहवालात म्हटले आहे की, विराट कोहलीने एका व्हिडिओमध्ये चाहत्यांना विजय परेडमध्ये मोफत येण्याचे आवाहन केले. विराटचा चाहता वर्ग मोठा असल्याची त्यालाही कल्पना आहे. त्यामुळे त्याने याचे भान राखणे अपेक्षित होते.

कर्नाटक सरकारच्या अहवालातील ठळक मुद्दे

निष्काळजीपणा आणि गैरव्यवस्थापन: चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. त्यात मूळ कारण निष्काळजीपणा आणि गैरव्यवस्थापन देण्यात आले आहे.

परवानगीशिवाय कार्यक्रम: आयोजक डीएनए नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडने ३ जून रोजीच पोलिसांना माहिती दिली, परंतु २००९च्या आदेशानुसार आवश्यक परवानगी घेतली नाही. या कारणास्तव, पोलिसांनी परवानगी देण्यास नकार दिला.

RCB व्यवस्थापनाचे दुर्लक्ष: परवानगी नाकारूनही, RCBने ४ जून रोजी सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा जाहीर प्रचार केला. विराट कोहलीने एका व्हिडिओमध्ये चाहत्यांना मोफत येण्याचे आवाहन केले.

तीन लाखांहून अधिक गर्दी: कार्यक्रमात झालेली गर्दी ही अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती, ज्यामुळे पोलिस व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली.

शेवटच्या क्षणी पासची घोषणा: कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळ आधी दुपारी ३:१४ वाजता आयोजकांनी अचानक घोषणा केली की स्टेडियममध्ये प्रवेशासाठी पास आवश्यक असतील. यामुळे लोकांमध्ये गोंधळ व घबराट निर्माण झाली.

गर्दी नियंत्रणात मोठी चूक: आरसीबी, डीएनए आणि केएससीए (कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना) यांच्यात समन्वयाचा मोठा अभाव होता. गेट उघडण्यास विलंब आणि गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ७ पोलिसही जखमी झाले.

मर्यादित कार्यक्रमासाठी परवानगी: परिस्थिती बिघडू नये म्हणून, पोलिसांनी एका लहान आणि मर्यादित कार्यक्रमासाठी परवानगी दिली होती.

कारवाई आणि शिक्षा: घटनेनंतर दंडाधिकारी आणि न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली. एफआयआर नोंदवण्यात आला. काही पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवांना निलंबित करण्यात आले. गुप्तचर प्रमुखांची बदली करण्यात आली आणि जखमींना भरपाई जाहीर करण्यात आली.

टॅग्स :बंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीविराट कोहलीकर्नाटकरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर