मेलबर्न : इंग्लंडला टी-२० विश्वचषक जेतेपद पटकावून देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या बेन स्टोक्सने याचवर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी स्टोक्स आपला निर्णय बदलून पुन्हा एकदिवसीय क्रिकेट खेळेल, अशी आशा इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मोट यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात स्टोक्सने नाबाद ५३ धावांची खेळी करत इंग्लंडला विश्वविजयी केले होते. तसेच, २०१९ मध्ये एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक अंतिम सामन्यातही स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ९२ धावा केल्या होत्या.