Join us  

कोहलीच्या नावावर विराट विक्रम, धोनी-गावस्करांना टाकलं मागे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार विराट कोहलीने आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 8:15 PM

Open in App

जोहान्सबर्ग - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार विराट कोहलीने आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावा 41 धावांची खेळी करत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम आपल्या नावे केला. 

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 3456 धावा केल्या आहेत तर धोनीच्या नावे 3454 धावा आहेत. सुनील गावस्कर या यादीत तिसऱ्या स्थानी गेले आहेत, त्यांच्या 3449 धावा आहेत. या कसोटी मालिकेमध्ये विराट कोहलीने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावत 286 धावा ठोकल्या आहेत. दुसऱ्या कसोटीमध्ये विराटने 153 धावांची शानदार खेळी केली होती. यासोबतच सचिन तेंडुलकर नंतर तो दुसरा फलंदाज बनला आहे ज्याने आफ्रिकेत दोन शतके लगावली आहेत. विराटने 2013 मध्ये जोहान्सबर्गमध्ये एक सेंच्युरी लगावली होती. 

विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमार यांच्या खेळाच्या बळावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर तिसऱ्या कसोटीमध्ये विजयासाठी 241 धावांचे आव्हान ठेवलं आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आफ्रिकेनं एक विकेटच्या मोबदल्यात पाच धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावाच्या दुसऱ्या षटकांत शमीनं भारताला पहिले यश मिळवून दिले. शमीनं सलामिवीर मार्करमला पार्थिव पटेलकरवी झेलबाद केलं होतं. सध्या मैदानावर एलगर आणि आमला पाय रोवून आहेत. तर भारताला विजयासाठी नऊ विकेटची गरज आहे. 

त्यापूर्वी, वाँडरर्स येथे खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे , विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमार यांच्या फलंदाजीच्या बळावर भारतानं दुसऱ्या डावात 240 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहली(41) आणि अजिंक्य रहाणे (48) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले. भुवनेश्वरनं पुन्हा एकदा संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. हार्दिक पांड्या, पुजारा, राहुल, पार्थिव आणि मुरली विजय पुन्हा एकदा अपयशी ठरले.  अजिंक्य आणि भुवनेश्वरमध्ये सातव्या विकेटसाठी 50 पेक्षा आधिक धावांची भागिदारी झाली.  भुवनेश्वर (33) आणि मोहम्मद शमी (29) यांनी अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत भारताच्या धावसंखेत भर घातली. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहलीएम. एस. धोनी