Mumbai Indians Bee Attack : मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीगचे १५वे सत्र काही खास ठरेल असे वाटत नाही. सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील आव्हान टीकवण्याची धडपड सुरू झाली आहे. अशात गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून गुणखाते उघडण्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू कसून सराव करत आहेत. पण, त्यातही व्यत्यय आला. बुधवारी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मधमाशांनी हल्ला केला आणि खेळाडूंना स्वतःला वाचवण्यासाठी मैदानावर लोटांगण घालावे लागले. मुंबई इंडियन्सने स्वतःच्या सोशल मीडियवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आयपीएलची सर्वाधिक ५ जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक ही बसलेली घडी विस्कळीत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स जणू विजय मिळवणे विसरलाच आहे. १५ कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजून संघात पुन्हा दाखल करून घेतलेल्या इशान किशनला काही खास करता आलेले नाही. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्मही चिंतेचा विषय ठरतोय. त्यात प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही प्रभाव पाडता आलेला नाही. डेथ ओव्हरमध्ये त्याला साथ देणारा गोलंदाज मुंबई इंडियन्सकडे नाही.
अशात सराव सत्रात मधमाशांनी व्यत्यय आणला आहे.
"मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील कामगिरी फारशी चांगली नाही. पण सर्वोत्तम खेळाडूंनादेखील अनेक वेळा दडपणाच्या स्थितीतून जावं लागतं. एक फटका संपूर्ण सामन्याचा कल बदलून टाकू शकतो. पण मला खात्री आहे की, अशा कठीण प्रसंगातून 'मुंबई इंडियन्स'ला बाहेर कसं काढायचं, हे रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्डसारख्या बड्या खेळाडूंना नीट माहिती आहे", असा विश्वास मुंबई इंडियन्सचा नवा गोलंदाज जयदेव उनाडकट याने व्यक्त केला.