- अयाज मेमन
कन्सल्टिंग एडिटर
भारत-पाकिस्तान यांच्यात ‘वनडे’ विश्वचषकाचा ‘महामुकाबला’ अहमदाबाद येथे १५ ऐवजी १४ ऑक्टोबर रोजी होईल. यामुळे सामन्यांबाबतची अनिश्चितता संपली आहे. नवरात्रोत्सवामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा बदल करण्यात आला. भारत-पाक लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तथापि, उभय संघांच्या चाहत्यांनी एक लक्षात ठेवायला हवे की, विश्वचषकात अनेक संघ आहेत. या संघांची तयारी भारत-पाकच्या तुलनेत कैकपटींनी भक्कम असावी.
भारतीय संघ व्यवस्थापनाकडे आता अधिक वेळ शिल्लक नाही. दोन महिन्यांचा वेळ असूनही भारतीय संघाला अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. आशिया चषकात काही प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. बुमराह चांगल्या फॉर्मसह संघात परतण्याची सर्वांना अपेक्षा असेल.
पाकिस्तानला
‘होमग्राउंड’ची स्थिती
भारत यजमान असल्याने चाहत्यांच्या संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, भारतीय खेळाडू घरच्या मैदानावर खेळणार; पण पाकिस्तानच्या खेळाडूंना भारतीय परिस्थिती नवीन नाही. काही प्रमाणात श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांनादेखील भारतातील माहोल घरच्यासारखाच वाटतो.
ऑस्ट्रेलिया भक्कम
जाणकारांच्या मते, भारत-पाकिस्तान संघ बलाढ्य असले, तरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कमी नाहीत. ऑस्ट्रेलियाकडे सध्या सर्वाधिक विश्वचषक ट्रॉफी आहेत. त्यांचे एक-दोन चेहरे वगळता सर्वच खेळाडू भारतात आयपीएल खेळतात. त्यामुळे इथली परिस्थिती त्यांना चांगलीच अवगत आहे.
इंग्लंडही दावेदार
गतविजेत्या इंग्लंडला संभाव्य दावेदार मानल्यास वावगे ठरू नये. २०१५ ला या संघाची स्थिती दयनीय होती. त्यानंतर खेळाडूंची विचारशैली बदलली अन् २०१९ ला हा संघ विश्वविजेता बनला. २०२३ च्या विश्वचषकातही त्यांना प्रबळ दावेदार मानले जाऊ शकेल.
श्रीलंका छुपा रुस्तम...
श्रीलंका संघ छुपा रुस्तम सिद्ध होऊ शकतो. न्यूझीलंडने विश्वचषकात नेहमी शानदार कामगिरी केली. या दोन्ही संघांना जेतेपदाच्या शर्यतीत ठेवण्यास हरकत नाही. दक्षिण आफ्रिका संघाला भारतीय खेळपट्ट्या कधीही भावलेल्या नाहीत. अफगाणिस्तान संघ अन्य संघांना नमवून समीकरण बिघडवू शकतो.
तिकीट विक्रीची प्रतीक्षा
दोन महिने शिल्लक असताना विश्वचषकाच्या तिकीट विक्रीला अद्याप सुरुवात झालेली नाही. चाहत्यांना स्वत: उपस्थिती दर्शवीत तिकिटे खरेदी करावी लागतील, असे बोलले जाते. मागच्या विश्वचषकाची तिकिटे वर्षभराआधी बुक झाली होती; पण येथे चाहत्यांच्या अडचणी वाढू शकतात. भारत-पाक सामन्याची तारीख बदलल्यानंतर चाहत्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली. त्यांना आता अधिक पैसे मोजावे लागतील. ‘बीसीसीआय’साठी हे सर्व आव्हानात्मक आहे. केवळ भारत-पाक सामना नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेत बोर्ड कशाप्रकारे पुढाकार घेऊन काम करते, यासाठी देशाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.