Join us

कोहलीविरुद्धच्या तक्रारीबाबत बीसीसीआयकडून 'विराट' स्पष्टीकरण

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी शाह यांच्याकडे कोहलीच्या कर्णधार पदाबद्दल आक्षेप नोंदवला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर रहाणे आणि पुजारा यांच्यावरही टीका झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 09:37 IST

Open in App
ठळक मुद्देमाध्यमांनी चुकीच्या बातम्या पसरवू नयेत. कुठल्याही भारतीय क्रिकेटर्सने विराट कोहलीबद्दल लेखी किंवा तोंडी तक्रार बीसीसीआयकडे केली नाही. बीसीसीय सातत्याने होणाऱ्या अशा चुकीच्या वृत्ताचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही.

मुंबई - यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. त्यामुळे पहिलंवहिलं जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. याच सामन्यानंतर विराट कोहलीचं कर्णधारपद धोक्यात आलं. त्यानंतर, विराट कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. त्यातच, विराटविरुद्ध बीसीसीआयकडे दोन खेळाडूंनी लेखी तक्रार दिल्याचेही वृत्त झळकले. मात्र, बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावले आहे. 

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी शाह यांच्याकडे कोहलीच्या कर्णधार पदाबद्दल आक्षेप नोंदवला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर रहाणे आणि पुजारा यांच्यावरही टीका झाली. या सामन्यात रहाणेनं ६४ (पहिल्या डावात ४९, दुसऱ्या डावात १५) धावा केल्या. तर पुजाराला केवळ २३ (पहिल्या डावात ८, दुसऱ्या डावात १५) धावाच करता आल्या होत्या. त्यामुळेच, रहाणे आणि पुजारा यांनी कोहलीविरुद्ध जय शहा यांच्याकडे तक्रार केल्याचे वृत्त माध्यमात झळकले. पण, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. 

माध्यमांनी चुकीच्या बातम्या पसरवू नयेत. कुठल्याही भारतीय क्रिकेटर्सने विराट कोहलीबद्दल लेखी किंवा तोंडी तक्रार बीसीसीआयकडे केली नाही. बीसीसीय सातत्याने होणाऱ्या अशा चुकीच्या वृत्ताचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. तसेच, विश्वचषक स्पर्धेसाठीही भारतीय संघाचा कर्णधार बदलण्यात येईल, हेही वृत्त निराधार असल्याचे अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे चर्चेतला वाद

इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाला. न्यूझीलंडनं हा सामना सहज जिंकला. या सामन्यात दोन्ही डावांत भारताची फलंदाजी लौकिकाला साजेशी झाली नाही. त्यानंतर विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर विराटनं अप्रत्यक्ष संघातल्या दोन खेळाडूंच्या फलंदाजीवर टिप्पणी केली. धावा करण्याची मानसिकता असायला हवी आणि धावा करण्याचे मार्ग शोधायला हवेत, असे शब्द त्यावेळी कोहलीनं वापरले होते. कोहलीनं ज्या दोन खेळाडूंबद्दल हे उद्गार काढले, त्याच खेळाडूंनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे त्याची तक्रार केली.

इंडियन एक्सप्रेसने दिले होते वृत्त

न्यू इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, रहाणे आणि पुजारांनी विराट कोहलीच्या ड्रेसिंग रुममधील वर्तनाबद्दल जय शाह यांच्याशी संवाद साधला. त्यांनी विराटच्या कर्णधारपदाबद्दलही चर्चा केली. त्यानंतर बीसीसीआयमध्ये हालचाली सुरू झाल्या. दोन वरिष्ठ खेळाडूंनी तक्रार केल्यानंतर बीसीसीआयनं अन्य खेळांडूकडे फीडबॅक मागितला. दौरा पूर्ण झाल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय याच हालचालींशी संबंधित असू शकतो.

काय म्हणाला विराट

दरम्यान, तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवत असल्यानं फलंदाजीवर फारसं लक्ष देता येत नसल्याचं विराटनं सांगितलं. त्यामुळेच टी-२०चं कर्णधारपद सोडत असल्याचं विराटनं जाहीर केलं. मात्र, यामागे इंग्लंडमध्ये झालेल्या तक्रारीचा हात असल्याचं सांगितलं जात होतं. पण, बीसीसीआयने स्पष्टीकरण दिल्यामुळे या वादावर पडदा पडला आहे.  

टॅग्स :विराट कोहलीजय शाहबीसीसीआय
Open in App