आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टी-२० आणि कसोटी मालिकेतून निवृत्ती घेणारे भारतीय खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वार्षिक पगारात कपात होण्याची शक्यता आहे असा रिपोर्ट समोर आला आहे. या दोघांना आधीपेक्षा २ कोटी रूपये कमी मिळू शकतात. २२ डिसेंबरला बीसीसीआय एपेक्स कौन्सिलची वार्षिक जनरल बैठक होणार आहे. ज्यात भारतीय क्रिकेटच्या या स्टार खेळाडूंच्या कॉन्ट्रॅक्ट आणि घरगुती क्रिकेटमध्ये महिला क्रिकेटरांच्या करारात फेरबदल करण्याची चर्चा होईल.
रोहित-विराटच्या ग्रेडवर होऊ शकते चर्चा
PTI रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एपेक्स कौन्सिलची जनरल बैठक ऑनलाईन होईल. ज्यात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. टेस्ट आणि टी २० मधून रिटायर झालेले रोहित आणि विराट यांना A+ ग्रेडमध्ये ठेवायचे की त्यांना A ग्रेडमध्ये आणायचे यावर चर्चा होण्याची शक्यता आहेत.
ग्रेड बदलणार, सॅलरी कमी होणार
चर्चेनुसार रोहित आणि विराट यांच्या ग्रेडमध्ये डिमोशन होण्याचे संकेत आहेत. म्हणजे यांना A+ ग्रेडमधून A ग्रेडमध्ये टाकले जाऊ शकते. ज्याचा परिणाम त्यांच्या वार्षिक पगारावर पडू शकतो. BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार A+ ग्रेड असणाऱ्या खेळाडूंना ७ कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो. जो सध्या विराट आणि रोहितला मिळत आहे. परंतु यातील सुधारणेनंतर जर हे दोघे A ग्रेडमध्ये आले तर त्यांचा वार्षिक पगार ५ कोटी इतका होऊ शकतो.
शुभमन गिलला होऊ शकतो मोठा फायदा
दरम्यान, शुभमन गिल याच्या ग्रेडमध्ये प्रमोशन मिळू शकते. गिल तिन्ही फॉर्मेटमधील क्रिकेट टीमचा भाग आहे. सध्या तो बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ए ग्रेडमध्ये आहे. परंतु २२ डिसेंबरला होणाऱ्या जनरल बैठकीत त्याचा ग्रेड वाढू शकतो. गिलला A+ ग्रेडमध्ये ठेवले जाऊ शकते. जर असे झाले तर गिल याचा बंपर फायदा होईल. त्याच्या वार्षिक पगारात २ कोटींची भर पडेल. याचा अर्थ शुभमन गिलला दरवर्षी ७ कोटीपर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे.