IPL २०२६ च्या मेगा ऑक्शनपूर्वी आणि आगामी हंगामासाठी सर्वच संघांनी आपली कंबर कसली आहे. मात्र, कोलकाता नाईट रायडर्स आणि बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांच्यासाठी एक चिंतेची बातमी समोर येत आहे. भारत-बांगलादेशमधील तणाव पाहता बीसीसीआय या खेळाडूला खेळविणार की नाही, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
कोलकाताने मिनी ऑक्शनमध्ये ९.२ कोटी रुपये मोजून मुस्तफिजुरला आपल्या संघात घेतले आहे. यामुळे कोलकाता संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. बीसीसीआयवर देखील टीका झाली आहे. यामुळे बीसीसीआयने थांबा आणि पहाची भूमिका घेतली असून केंद्र सरकारने निर्देश दिले तरच बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळविले जाणार नाही, असे म्हटले आहे.
आणखी एक अडचण म्हणजे...
बीसीसीआयने परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत आता कडक भूमिका घेतली आहे. जर एखादा परदेशी खेळाडू लिलावात नाव नोंदवतो आणि निवड झाल्यानंतर माघार घेतो, तर त्याच्यावर दोन वर्षांच्या बंदीची तरतूद करण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड अनेकदा आपल्या खेळाडूंना एनओसी देताना आंतरराष्ट्रीय सामन्यांचे कारण पुढे करून अर्ध्या हंगामातून परत बोलावते. यामुळे आयपीएल फ्रँचायझींचे गणित बिघडते. मुस्तफिजुर रहमानने गेल्या काही हंगामात शानदार कामगिरी केली आहे. केकेआरसारख्या संघांना त्यांच्या डेथ ओव्हर्ससाठी मुस्तफिजुरसारख्या चतुर गोलंदाजाची गरज आहे. मात्र, जर बांगलादेश बोर्डाने त्याला पूर्ण हंगामासाठी परवानगी दिली नाही, तर केकेआर किंवा इतर कोणताही संघ त्याच्यावर बोली लावण्यापूर्वी दोनदा विचार करेल.
बांगलादेश बोर्डाची भूमिका काय?
२०२६ मध्ये बांगलादेशचे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दौरे आणि मालिका नियोजित आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे बोर्ड आपल्या मुख्य वेगवान गोलंदाजाला दुखापतीपासून वाचवण्यासाठी आयपीएलपासून दूर ठेवू शकते किंवा मर्यादित काळासाठीच परवानगी देऊ शकते.