भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार कोण म्हटलं की चाहते महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतात. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला. माहीने २००७ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवले, तर २०११ मध्ये २८ वर्षांचा दुष्काळ संपवून भारताला वन डेमध्ये चॅम्पियन बनवले. धोनीने कर्णधारपदाची धुरा स्वीकारल्यानंतर भारतीय क्रिकेटला एक नवीन वळण मिळाले. एक फिनिशर आणि यशस्वी कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या धोनीने अनेक संस्मरणीय सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. पण, धोनीला भारताचा कर्णधार बनवण्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हात होता, असा खुलासा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केला आहे.
जय शहांचा मोठा खुलासा ज्या भूमीत स्ट्रेट ड्राईव्हचा बादशाह, क्रिकेटचा देव, सर्वांचा लाडका मराठमोळा सचिन घडला त्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर तेंडुलकर अर्थात 'क्रिकेटचा देव' अवतरला आहे. होय, कारण वानखेडे स्टेडियमवर नवोदित क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळावी म्हणून अन् महान रत्नाला सलाम म्हणून सचिनच्या फलंदाजीचे चित्रिकरण दाखवण्यात आले आहे. बुधवारी सचिनच्या या २२ फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अनावरण झाल्यानंतर जय शहा यांनी सचिनवर कौतुकाचा वर्षाव करताना 'क्रिकेटच्या देवा'चे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, सचिनने धोनीला कर्णधार बनवण्याचा सल्ला दिला होता. बीसीसीआय सचिव म्हणाले, "कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे नाव सचिननेच सुचवले होते. मी अनेक निर्णय घेतले आहेत, त्यापैकी अनेक निर्णयांमध्ये सचिनचा सल्ला होता."
धोनीने एकूण ६० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, ज्यापैकी टीम इंडियाने २७ सामने जिंकले आणि १८ सामने गमावले. वन डे क्रिकेटमध्ये माहीने १९९ सामन्यांमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली आणि ११० सामने जिंकण्यात टीम इंडियाला यश आले. तर, ७४ सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, सचिन तेंडुलकरची ओळख असलेला विशेष फटका मारतानाच्या शैलीतील हा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याच्या नावाने असलेल्या स्टँडच्या बाजूला हा पुतळा उभारण्यात आलेला असून दिग्गजांच्या उपस्थितीत याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा चबुतऱ्यासह एकूण २२ फूट उंचीचा आहे. विजय मर्चंट सँट आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा उभारण्यात आला आहे.