Join us  

...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर

येत्या जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 4:59 PM

Open in App

Jay Shah News : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह हे नेहमी चर्चेत असतात. आयपीएल असो की मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट... शाह अनेकदा खेळाडूंना चीअर करताना दिसले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र असल्याने त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली आहे. आता जय शाह यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल सांगताना कोरोना काळात झालेल्या आयपीएलबद्दल भाष्य केले आहे. इतर मोठ्या लीग कोरोनाच्या समस्येमुळे रद्द करण्यात आल्या, पण दुबईच्या धरतीवर आयपीएलचा हंगाम पाडण्यात आम्हाला यश आले असल्याचे ते सांगतात. 

जय शाह मागील काही वर्षांपासून बीसीसीआय सचिव म्हणून भारतीय क्रिकेटचा कारभार पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेकदा बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद झाला. आशिया चषकाचे संपूर्ण आयोजन पाकिस्तानात करण्यास शाह यांनी विरोध दर्शवला. मग भारताचे सामने तटस्थ ठिकाणी अर्थात श्रीलंकेत खेळवले गेले. 

जय शाह यांनी सांगितली पॉवर जय शाह यांना त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठी उपलब्धता विचारली असता त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. ते म्हणाले की, कोरोनासारखी मोठी समस्या असताना देखील २०२० मध्ये यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करू शकलो, ही माझी सर्वात मोठी उपलब्धता आहे. त्यावेळी ऑलिम्पिक, इंग्लिश प्रीमिअर लीग आणि फ्रेंच ओपनसारख्या मोठ्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. काही स्पर्धा रद्द देखील कराव्या लागल्या. पण, त्यावेळी आम्ही संपूर्ण जगाला दाखवून दिले की बीसीसीआय काय करू शकते. जय शाह 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलत होते. 

येत्या जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या आधी सराव सामने खेळवले जातील. भारत आणि बांगलादेश यांच्यात १ जून रोजी सराव सामना होणार आहे. भारतीय संघ २०२३ च्या विश्वचषकात स्पर्धेचा प्रबळ दावेदार होता. पण, सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरी गाठणाऱ्या भारताला बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाकडून यजमान संघाचा पराभव झाला. टीम इंडियाने सलग १० सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती, पण रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला पॅट कमिन्सच्या संघावर विजय नोंदवता आला नाही. अशाप्रकारे २०११ नंतर भारताचे जगज्जेते होण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरेच राहिले.

टॅग्स :जय शाहबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ