मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) अर्जुन पुरस्कारासाठी महिला क्रिकेटपटू पूनम यादव आणि भारताच्या वर्ल्ड कप संघातील सदस्य रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाची शिफारस केली आहे.
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी
बीसीसीआयने नुकताच संघ जाहीर केला. त्यात अनपेक्षितपणे जडेजाच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. शमी आणि बुमराह हे भारताचे प्रमुख गोलंदाज आहे. या दोघांनी मागील काही वर्षांत परदेशात आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धींना हतबल केले आहे. बुमराहने अल्पावधीतच भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. बुमराहने 49 वन डे सामन्यांत 85 विकेट्स घेतल्या आहेत. शमीनेही 63 वन डे सामन्यांत 113 विकेट्स नावावर केल्या आहेत.
रवींद्र जडेजा हा संघाचा नियमित सदस्य नसला तरी त्याने अनेक सामन्यांत अष्टपैलू कामगिरी करताना विजय मिळवून दिले आहेत. त्याने 151 वन डे सामन्यांत 2035 धावा केल्या आहेत आणि 174 विकेट्सही घेतल्या आहेत. महिला क्रिकेटपटू पूनम यादवने 41 वन डे सामन्यांत 63 विकेट घेतल्या आहेत. तिने आपल्या फिरकी गोलंदाजीवर प्रतिस्पर्धींना नाचवले आहे.