मुंबई : हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांच्यावरील निलंबन बीसीसीआयने अखेर मागे घेतले आहे. त्यामुळे पंड्या आणि राहुल यांचा न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे दोघांना दिलास मिळाला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंड्या आणि राहुल यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. पण या दोघांची चौकशी मात्र होणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासकिय समितीने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे म्हटले गेले आहे.
हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना 'कॉफी विथ करण- 6' या कार्यक्रमात केलेलं विधान चांगलेच भोवले आहे. बीसीसीआयने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातून त्यांना माघारी बोलावले आहे. पण हार्दिक आणि राहुल या दोघांना एक आशेचा किरण आज दिसला आहे.
बीसीसीआयने हार्दिक आणि राहुल यांच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एका आठवड्यानंतर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे हार्दिक आणि राहुल यांच्या भविष्याबाबत बऱ्याच जणांना चिंता वाटत आहे. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी त्यांची बाजू घेतल्याचे निदर्शनास आले आहे. खन्ना यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये खन्ना यांनी हार्दिक आणि राहुल यांची बाजू घेतली होती.
खन्ना यांनी पत्रात लिहिले होते की, " हार्दिक आणि राहुल यांनी चूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून माघारी बोलवण्यात आले. हार्दिक आणि राहुल या दोघांनीही बिनशर्त माफी मागितली आहे. जोपर्यंत या दोघांच्या बाबतीत निर्णय येत नाही. तोपर्यंत त्यांना खेळण्याची संधी देण्यात यावी. त्यांना लवकरच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाण्याची परवानगी देण्यात यावी. "