Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीच्या मदतीला धावली बीसीसीआय, केले त्या वृत्ताचे खंडन 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला प्रशासकीय समितीने संमजसपणे वागण्याची ताकीद दिल्याचे वृत्त होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 17:49 IST

Open in App

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला प्रशासकीय समितीने संमजसपणे वागण्याची ताकीद दिल्याचे वृत्त होते. काही दिवसांपूर्वी चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना कोहलीने त्याला 'देश सोडण्याचा' सल्ला दिला होता. त्यावरून त्याने वाद ओढावून घेतला होता आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) त्याची चांगलीच कानउघडणी केली होती. त्यामुळे प्रशासकीय समितीने त्याला ताकीद दिल्याची चर्चा होती, परंतु बीसीसीआयने हे वृत्त खोटं असल्याचे स्पष्टीकरण रविवारी दिले.  

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. 21 नोव्हेंबरला ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. मालिकेला रवाना होण्यापूर्वी प्रशासकीय समितीच्या एका सदस्याने कोहलीशी व्हॉट्सअॅपवर चर्चा केली आणि त्याला प्रसारमाध्यमे आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेने वाग, अशी ताकीद देण्यात आली आहे. भारतीय कर्णधारपदाला साजेसे वर्तन कर, असा सल्लाही समितीने दिला असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. 

त्यावर बीसीसीआयने रविवारी स्पष्टीकरण दिले. हे सर्व वृत्त चुकीचे असल्याचे मत बीसीसीआयने व्यक्त केले. असे स्पष्टीकरण देऊन बीसीसीआय कोहलीच्या मदतीला धावून आल्याची चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय