नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) क्रिकेटप्रमुख पदासाठी उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. या पदासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड पुन्हा एकदा अर्ज करू शकतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भारताच्या राखीव खेळाडूंची मजबूत फळी बनवण्यामध्ये द्रविड यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांची जुलै २०१९ मध्ये एनसीएचे प्रमुख म्हणून निवड झाली होती. त्याआधी द्रविड यांनी १९ वर्षांखालील भारतीय संघ आणि भारत अ संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवोदित खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. एनसीएप्रमुख म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने बीसीसीआयने नव्याने या पदासाठी अर्ज मागवले आहेत. त्याचवेळी, या पदासाठी द्रविड पुन्हा एकदा अर्ज करतील, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत अर्ज करण्याची मुदत उमेदवारांना दिली आहे.
द्रविड बनणार का भारताचे प्रशिक्षक?
श्रीलंका दौरा संपल्यानंतर द्रविड यांना भारताच्या मुख्य संघाच्या प्रशिक्षकपदाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी द्रविड म्हणाले होते की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी दूरचा विचार करत नाही. सध्या मी जे काम करतोय, त्याचा आनंद घेतोय.’ मुख्य संघाच्या प्रशिक्षकासाठी निर्धारित वयोमान हे एनसीएप्रमुख इतकेच ६० वर्षांचे आहे.