Join us  

पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं!

महेंद्रसिंग धोनीच्या निमित्तानं बीसीसीआयनं देशातील किती खेळाडूंना अशी वागणून दिली आणि किती जणांना सन्मान दिला, ते पाहूया..

By स्वदेश घाणेकर | Published: August 18, 2020 4:18 PM

Open in App
ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनीसाठी एक निवृत्तीचा सामना आयोजित करावा, ही क्रिकेटचाहत्यांची इच्छाराहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग यांनाही मिळाली अशी वागणूक

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या सामन्याचे आयोजित करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( बीसीसीआय) तशी इच्छा व्यक्त केलेली नाही, इंडियन प्रीमिअर लीगचे माजी चेअरमन राजीव शुक्ला यांनी ग्रेट कॅप्टन धोनीच्या निवृत्तीच्या सामन्याच्या प्रश्नावर प्रसारमाध्यमांना दिलेलं हे उत्तर. 15 ऑगस्ट 2020 ही तारीख धोनी चाहत्यांसाठी धक्का देणारी ठरली. मागील वर्षभरापासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होतीच, पण धोनी मैदानाबाहेर निवृत्त होईल, असा विचार कुणी ध्यानी मनी केला नसेल. 

BREAKING: टाटा सन्स, बायजूला मागे सारून 'ड्रीम 11' झाले IPL 2020 चे स्पॉन्सर, मोजले 222 कोटी

Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार

जरा 7 वर्ष मागे जाऊया...2013चा वानखेडेवर झालेला सचिन तेंडुलकरचा निरोपाचा सामना आठवतो... विक्रमादित्य सचिनला अखेरचं मैदानावर याची देही, याची डोळा पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरले होते. नरसिंग देवनरीनच्या गोलंदाजीवर कट शॉट मारण्याचा केलेला प्रयत्न अन् चेंडूनं घेतलेली अतिरिक्त उसळी... त्याने सचिनचा प्लान फलसा अन् पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या डॅरेन सॅमीच्या हातात चेंडू अलगद विसावला... क्षणात 50-55 हजारांच्या संख्येनं उपस्थित असलेल्या वानखेडे स्टेडियमवर एक चिटपाखरूही नाही असे वाटू लागले. स्टेडियममधील प्रत्येक जण शांत झाला होता. वीसेक वर्ष ज्याच्या खेळानं अगदी क्रिकेटचे वेड लावले, तो फलंदाजीला आला की तहानभूक विसरायला व्हायचं, 90 धावांचा उंबरठा ओलांडल्यानंतर त्याच्या शतकी धावेपर्यंत अक्षरशः जीव मूठीत घेऊन बसावे लागायचे... तो सचिन ( 74) पेव्हेलियनमध्ये परतता होता.

त्याचे हे जाणे अखेरचे होते, यानंतर सचिन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नव्हता.. लाडक्या तेंडल्याची पाठमोरी प्रतीमा आजही डोळ्यासमोर उभी राहिली की पापण्या आपसूकच ओल्या होतात.. त्या क्षणाचा साक्षीदार असल्यानं आजही अंगावर शहारा उभा राहतो. स्टेडियमधील प्रत्येक जण तेंडल्याला निरोप देताना रडत होता. एवढंच काय प्रेस बॉक्समध्येही प्रत्येकाच्या भावना दाटून आल्या होत्या....  ज्या मैदानावर सचिन घडला त्या मुंबई शहरातील प्रत्येकासाठी हा निरोपाचा सामना आयोजित करून बीसीसीआयनं एकप्रकारे त्यांच्यावर उपकारच केले होते. कारण, यानंतर सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह, कट शॉट, अपर कट, हुक, कव्हर ड्राईव्ह आदी मंत्रमुद्ध करणारे फटके पुन्हा पाहता येणार नव्हते...

सचिनसाठी जे जमलं ते इरकांसाठीही करता आलं असतं...सचिन तेंडुलकरचा तो निरोपाचा सामना 7 वर्षांची आठवण्याचं कारण की, महेंद्रसिंग धोनीसाठी निवृत्तीचा सामना का नाही... जुलै 2019मध्ये धोनीनं ब्लू जर्सीत अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. इथे धोनी आणि सचिन अशी तुलना करायची नक्कीच नाही... सचिन सचिन आहे आणि धोनी धोनी... पण, धोनीला सन्मानपूर्वक निरोप देता आला असता. वन डे वर्ल्ड स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभव धोनीच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. मैदान सोडताना धोनीच्या डोळ्यात अश्रू दाटले होते, परंतु त्यानं ते बाहेर पडू दिले नाही. पण, आतल्या आत धोनीला हे कळून चुकलं होतं, की आता बस... मग त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या... प्रत्येक क्रिकेटपटूच्या आयुष्यात हा क्षण येतो. पण, इतकी वर्ष देशासाठी निस्वार्थ भावनेनं सेवा करणाऱ्या धोनीसाठी निरोपाचा सामना आयोजित करावा, ही मागणी रास्त आहे. मुंबई इंडियन्सननं धोनीच्या निवृत्तीनंतर एक बोलकं चित्र पोस्ट केलं... धोनीनं जेव्हा टीम इंडियात एन्ट्री घेतली तेव्हा भारतीय संघांच्या भींतींना तडे जात होते आणि तो जेव्हा निवृत्त झाला, तेव्हा तिच भींत भक्कम, मजबूत झाली होती... धोनीकडे कसोटी कर्णधारपद अचानक आलं... 2008मध्ये अनिल कुंबळेनं कसोटी कर्णधारपद सोडलं, त्यावेळी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांना विचारणा केली आणि दोघांनी धोनीचं नाव पुढे केलं. त्यानंतर धोनीनं जे करून दाखवलं त्याचे आपण प्रत्येक जण साक्षीदार आहोत.

वन डे, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे धोनी... आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियानं अव्वल स्थान मिळवले, ते धोनीच्या नेतृत्वाखालीच... 40 वर्षांत ऑस्ट्रेलियाला कसोटीत व्हाईटवॉश कुणी दिला नव्हता, तो धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विक्रम नोंदवला...  याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. अशा या विक्रमादित्य धोनीसाठी निरोपाचा सामना आयोजित करायलाच हवा. 

बीसीसीआयची पॉलिसीच नसल्यानं दिग्गजांवर होतोय अन्याय....

राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, व्ही.व्ही,एस लक्ष्मण, आदी महान खेळाडूंनाही निरोपाचा सामना खेळता आला नाही. मुळात बीसीसीआयनं त्यांच्यासाठी निरोपाचा सामना आयोजित करण्याची इच्छाच दाखवली नाही. आज त्यांच्या पंक्तीत धोनीचा समावेश झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्या खेळाडूंना निरोपाचा सामना कुठे खेळायचा याची निवड करायला सहा महिन्याचा कालावधी देते. म्हणजे, एखाद्या खेळाडूची कारकिर्द उतरतीला आली आहे, असे समजताच ते त्याला ही तुझी शेवटची सहा महिने आहेत, निवृत्तीचा सामना कुठे खेळायचा ते कळवं... हा असा पर्याय बीसीसीआय त्यांच्या खेळाडूंना का देत नाही? 

देशासाठी या खेळाडूंचं फार मोठं योगदान आहे. जी संधी सचिनच्या चाहत्यांना मिळाली, ती अन्य खेळाडूंच्या चाहत्यांना का मिळू नये? याचा विचार आता तरी बीसीसीआयनं करावा... अन्यथा पुढे विराट कोहली, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, शिखर धवन, रोहित शर्मा या खेळाडूंनाही मैदानाबाहेर निवृत्ती जाहीर करावी लागेल. त्यावेळी चाहत्यांच्या रोषाचा पारा प्रचंड चढलेला असेल आणि बीसीसीआयला त्याची मोठी किंम्मत मोजावी लागू शकते... आता तरी बीसीसीआयनं  निवृत्तीच्या निमित्ताने अपमानाचा 'नारळ' देण्याचं काम थांबवावं... या क्रिकेटपटूंच्या जोरावर बीसीसीआय आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे, हे त्यांनी विसरू नये...

बीसीसीआय कसोटी खेळलेल्या खेळाडूंना निवृत्ती वेतनं देतं, परंतु खेळाडू निवृत्त होताना त्याचा सन्मान राखणे कधी सुरू करतील, हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. धोनीच्या चाहत्यांचा भावनांचा अपमान करणाऱ्या बीसीसीआयनं आता तरी सुधरावं... 

कमनशीबी धोनी अन् अन्य... 

कॅप्टन कूल...महेंद्रसिंग धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. पण, त्याची निवृत्ती मैदानाबाहेर...

दी वॉल...9 मार्च 2012 राहुल द्रविडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2007, 2009 आणि 2011 या तीन वर्षांत द्रविडला जी अपमानजनक वागणूक दिली गेली, ती त्याचे चाहते कधीच विसरणार नाहीत... 2007 मध्ये वन डे संघातून वगळले, त्यानंतर 2009 आणि त्यानंतर पुन्हा 2011मध्ये संघ संकटात असताना बीसीसीआयला द्रविडची आठवण झाली. या अपमानाला कंटाळून त्यानं 2012मध्ये निवृत्ती जाहीर केली. द्रविडनं 164  कसोटी, 344 वन डे आणि 1 ट्वेंटी-20 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 13288, 10889 आणि 31 धावा केल्या. ओपनर, मिडल ऑडर, यष्टीरक्षक, कर्णधार या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या द्रविडच्या वाट्यालाही निवृत्तीचा सामना आला नाही.

व्हेरी व्हेरी स्पेशल....कोलकाता कसोटीतील ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजय हा व्ही व्ही एस लक्ष्मण याच्या नावाशिवाय शक्य होणार नाही. द्रविड अन् लक्ष्मण यांनी केलेल्या त्या पराक्रमानं इतिहासाच्या पुस्तकात मानाचं स्थान मिळवलं आहे. 2012मध्येच त्यानं अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यानं 134 कसोटी व 86 वन डे सामन्यांत अनुक्रमे 8781 व 2338 धावा केल्या.

स्फोटक वीरू....भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्या नशीबीही मैदानावर निवृत्ती नव्हतीच. वीरूनं 104 कसोटी व 251 वन डे सामन्यांत अनुक्रमे 8586 आणि 8273 धावा केल्या. कसोटीत दोन त्रिशतक नावावर असलेला एकमेव भारतीय फलंदाज आहे. 

जहीर खान...कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांच्यानंतर भारतीय संघाची गोलंदाजीची जबाबदारी सक्षमपणे खांद्यावर घेणारा गोलंदाज म्हणून जहीर खानचं आजही नाव घेतलं जातं. 2014 त्यानं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. न्यूझीलंड दौऱ्यावरील वेलिंग्टन कसोटीत त्याला पाच विकेट घेता आल्या. तो सामना ब्रेंडन मॅकलम याच्या त्रिशतकानं गाजला आणि त्यानंतर जहीरला संघातून वगळले. त्यानं 92 कसोटी व 200 वन डे सामन्यांत अनुक्रमे 311 व 282 विकेट्स घेतल्या. 

युवी सिक्सर किंग...2007मध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार, 2011च्या वर्ल्ड कप विजयाचा खरा नायक युवराज सिंगलाही मैदानाबाहेर निवृत्ती घ्यावी लागली. युवीनं 40 कसोटी, 304 वन डे आणि 58 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 1900, 8701 व 1177 धावांसह 9, 111 व 28 विकेट्सही घेतल्या आहेत. 

 राजीव शुक्लांना या निमित्तानं एक विचारासं वाटतं, की खेळाडूनं स्वतःहून निरोपाचा सामना खेळण्याची इच्छा का व्यक्त करावी? जेव्हा खासदारकीची टर्म संपवून निवृत्त होता, तेव्हा तुमच्या अभिनंदनाचा प्रस्ताव तुम्ही इच्छा व्यक्त केल्यानंतर ठेवला जातो की संसदीय कामकाजाचा भाग म्हणून ती प्रथा आहे? त्यामुळे धोनीनं इच्छा व्यक्त न करताच ती मान्य करायला हवी होती.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसचिन तेंडुलकरबीसीसीआयराहूल द्रविडविरेंद्र सेहवागझहीर खानयुवराज सिंग