मुंबई : 33 वर्षीय अंबाती रायुडूने शनिवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. भारतीय वन डे व ट्वेंटी-20 क्रिकेट संघात मजबूत होत असलेले स्थान लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला. उर्वरित क्रिकेट कारकिर्दीत वन डे व ट्वेंटी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. पण, रायुडूवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) बंदीची कारवाई केली होती. भारतीय संघात त्याची घरवापसीच झाली असे म्हणावे लागेल.
हैदराबाद क्रिकेट संघाकडून 2001 मध्ये रायुडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सत्रात त्याला साजेसा खेळ करता आला नाही, परंतु पुढीत सत्रात त्याने आंध्र प्रदेशविरुद्ध 210 आणि नाबाद 159 धावांची खेळी करताना आपलं नाणं खणखणीत वाजवलं. मात्र, भारताचे माजी क्रिकेटपटू शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जुन यादव याच्याशी खटके उडाल्याने त्याने आंध्र प्रदेशकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
आंध्र प्रदेशकडून त्याला फार काळ खेळता आले नाही. 2007 ते 2009 या कालावधीत इंडियन क्रिकेट लीगमध्ये ( आयसीएल) तो खेळला.
बीसीसीआयचा या लीगला विरोध होता आणि म्हणून त्यांनी या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयच्या कोणत्याची स्पर्धेत खेळण्याची परवानगी नाकारली. याचा फटका रायुडूलाही बसला, परंतु हा वाद मिटला आणि रायुडू हैदराबाद संघात परतला. त्यानंतर बडोदा आणि विदर्भ संघांचेही त्याने प्रतिनिधित्व केले.
2013 मध्ये रायुडूने भारतीय संघात पदार्पण केले. त्यानंतर तो आतबाहेर होत राहिला. मात्र, सध्याचा फॉर्म पाहता त्याने वन डे संघातील स्थान पक्के केले आहे. त्यामुळेच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रायुडूने 97 प्रथम श्रेणी सामन्यांत 45.56 च्या सरासरीने 6151 धावा केल्या आहेत. त्यात 16 शतकांचा समावेश आहे. 210 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.