Join us  

women ipl 2023: "हा दिवस महिला क्रिकेटसाठी अविस्मरणीय", भारतीय महिला खेळाडूंनी BCCI चे मानले आभार!

women ipl auction: महिला आयपीएल आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:04 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतात क्रिकेटला मरण नाही, हे उगीच म्हटले जात नाही. इथे स्थानिक पातळीवरील सामने पाहण्यासाठी देखील तौबा गर्दी होत असते. त्यात इंडियन प्रीमिअर लीगने ( IPL) भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर पोहोचवले. जागतिक क्रिकेटचे सर्व आर्थिक मार्केट आयपीएलने आपल्याकडे खेचला अन् त्यामुळेच येथे पैशांचा पाऊस पाहायला मिळत आहे. BCCI ने आता महिला आयपीएल आणण्याची हालचाल सुरू केली आहे आणि पहिल्या पर्वात 5 संघ खेळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याच महिला आयपीएलसाठीचे मीडिया हक्कांचा आज लिलाव झाला. ज्यामध्ये Viacom-18 ने यशस्वी बोली लावून मीडिया अधिकारांचे अधिकार संपादन केले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अधिकृतपणे याबाबत माहिती दिली. 

वायकॉम-18 ने संयुक्त अधिकारांसाठी यशस्वी बोली लावली. मीडिया हक्क 2023 ते 2027 पर्यंत  वायकॉम-18 कडेच राहतील. पुरुष आयपीएलमध्ये तिन्ही अधिकार वेगवेगळे विकण्यात आले आहेत. पुरुष आयपीएलमध्ये वायकॉमने डिजिटल अधिकार 23.758 कोटींत खरेदी केले असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

भारतीय महिला खेळाडूंनी मानले आभार!  महिला आयपीएलच्या या ऐतिहासिक करारानंतर भारतीय महिला खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच ट्विटच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आभार मानले आहेत. भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने ट्विट करत म्हटले, "महिला आयपीएल महिला क्रिकेट आणि सर्वसाधारणपणे क्रिकेटसाठी गेम चेंजर असेल. आजचा करार त्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. @BCCI, @BCCIWomen, @JayShah सर."

हा दिवस महिला क्रिकेटसाठी अविस्मरणीय - स्मृती मानधना तसेच मराठमोळी स्मृती मानधना, झुलन गोस्वामी, हरलीन देओल आणि भारतीय संघाची विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील बीसीसीआयचे आभार मानले. "आजचा दिवस प्रत्येक भारतीय महिला क्रिकेटपटूच्या लक्षात राहील. #WIPL अखेर आकार घेत आहे. @BCCI, @JayShah आणि त्यात सहभागी असलेले सर्व कौतुकास पात्र आहेत. या जागतिक स्तरावर महिला क्रिकेट पुढील स्तरावर जाईल", अशा शब्दांत स्मृती मानधनाने महिला आयपीएलबद्दल उत्सुक असल्याचे म्हटले. 

महिला आयपीएलचे आयोजन मार्चमध्ये  महिलांच्या आयपीएल मीडिया हक्कांच्या शर्यतीत वायकॉम-18 व्यतिरिक्त झी, सोनी आणि डिस्ने स्टारदेखील सामील होते. पण ही शर्यत वायकॉमने जिंकली. महिला आयपीएल 2023 च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. स्पर्धा 3 ते 26 मार्च या कालावधीत होण्याची दाट शक्यता आहे. खरं तर पहिल्या हंगामात फायनलसह एकूण 22 सामने खेळवले जाऊ शकतात.

प्रत्येक सामन्याची किंमत 7.09 कोटी  बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, "महिला आयपीएल मीडिया हक्क जिंकल्याबद्दल वायकॉम-18 चे अभिनंदन. वायकॉमसोबत मीडिया अधिकारांतर्गत पाच वर्षांसाठी 951 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. म्हणजेच प्रत्येक सामन्यासाठी 7.09 कोटी रुपये खर्च येणार आहे. याआधी पुरुषांच्या आयपीएलच्या मीडिया हक्कांमधून बीसीसीआयने जवळपास 48,300+ कोटी कमावले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

 

टॅग्स :बीसीसीआयभारतीय महिला क्रिकेट संघआयपीएल २०२२स्मृती मानधनामिताली राज
Open in App