भारतात क्रिकेटला मरण नाही, हे उगीच म्हटले जात नाही.... इथे लोकल क्रिकेट सामने पाहण्यासाठीही तौबा गर्दी असते... त्यात इंडियन प्रीमिअर लीगने ( IPL) भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर पोहोचवले. जागतिक क्रिकेटचं सर्व आर्थिक मार्केट आयपीएलने आपल्याकडे खेचला अन् त्यामुळेच येथे पैशांचा पाऊस पाहायला मिळत आहे. BCCI ने आता महिला आयपीएल आणण्याची हालचाल सुरू केली आहे आणि पहिल्या पर्वात ५ संघ खेळणार  असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याच महिला आयपीएलसाठीचे मीडिया हक्कांचा आज लिलाव झाला. ज्यामध्ये Viacom18 ने यशस्वी बोली लावून मीडिया अधिकारांचे अधिकार संपादन केले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अधिकृतपणे याची माहिती दिली. 
महिला इंडियन प्रीमियर लीग यंदा होणार आहे. त्यासाठी आज माध्यम हक्कांसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. Disney+ Star, Sony-Zee आणि Viacom18 हे त्यांच्या अधिकार्यांसाठी बोली लावण्यात आघाडीवर होते. अधिकृत घोषणेची पुष्टी करताना, बीसीसीआयने या कराराची माहिती दिली. पुढील पाच वर्षांसाठी ९५१ कोटींचा करार झाला आहे. याआधी पुरुषांच्या आयपीएलच्या मीडिया हक्कांमधून बीसीसीआयने जवळपास ४८,३००+ कोटी कमावले आहेत.
![]()
BCCI सचिव जय शाह यांनी ट्विट करून आयपीएल मीडिया हक्कांसाठी Viacom18 च्या विजयाची माहिती दिली. जय शाह यांनी लिहिले,“महिला आयपीएलचे मीडिया हक्क Viacom18 ने जिंकले आहेत. BCCI आणि महिला संघावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. पुढील पाच वर्षांसाठी (२०२३ ते २०२७ ) ९५१ कोटींचा करार झाला आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी ७.९ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. महिला क्रिकेटसाठी हे खूप मोठे आहे.
यापूर्वी, महिला महिला ट्वेंटी-२० चॅलेंज स्पर्धा खेळली गेली, ज्यामध्ये एकूण ३ संघ खेळले आणि सामन्यांची संख्या देखील ५ होती. स्टार स्पोर्ट्सला प्रत्येक सामन्यासाठी अडीच कोटी रुपये मोजावे लागत होते. सध्या, भारतीय महिलांच्या ट्वेंटी-२० सामन्याचा GRP 0.5 ते 0.7 आहे. त्यामुळे प्रत्येक आयपीएल सामन्यासाठी २५ टक्के हक्क ही वाजवी रक्कम असेल.    
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"