नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बहुप्रतिक्षित निवडणूक आता २२ ऐवजी २३ ऑक्टोबरला होईल. महाराष्ट्र तसेच हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीमुळे तारीख बदलण्यात आल्याची माहिती संचालन करणाऱ्या प्रशासकांच्या (सीओए) समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिली. दोन्ही राज्यात २१ ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल. या दोन राज्यातील मतदान करणाऱ्या राज्य संघटनांच्या प्रतिनिधींना त्रास होऊ नये, यासाठी निवडणूक एक दिवस पुढे ढकलण्यात आली.
सीओए प्रमुख राय म्हणाले, ‘बीसीसीआय निवडणूक होणारच आहे. राज्यांच्या निवडणुकीमुळे आम्ही ही तारीख एक दिवस पुढे ढकलली. सीओए सदस्य डायना एडुल्जी यांनी, ‘कुठल्याही विलंबाला आपला विरोध असला तरी राज्य विधानसभा निवडणुकीमुळे एक दिवसाने क्रिकेट निवडणूक पुढे ढकलली हे समजू शकते,’ असे सांगितले.
माजी कर्णधार एडुल्जी पुढे म्हणाल्या, ‘सर्वोच्च न्यायालयाने २० सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्य संघटनांना निवडणूक पार पाडण्यास काही दिवसाची सूट शक्य आहे. बीसीसीआय निवडणूक मात्र वेळेवरच व्हावी. २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे एक दिवस उशिराने क्रिकेट निवडणूक होईल.’ तामिळनाडू क्रिकेट संघटनेला निवडणूक घेण्यास परवानगी दिल्याप्रकरणी स्पष्टीकरण मागण्यात आले होते. (वृत्तसंस्था)