Join us

परदेश दौऱ्यावर बायको किंवा गर्लफ्रेंडला नेण्याबाबत बीसीसीआयने बदलला नियम; कर्णधार कोहलीचा अधिकार काढला

हा बदल करताना बीसीसीआयने कर्णधार विराट कोहलीचा अधिकार काढल्याचेही पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 13:36 IST

Open in App

मुंबई : परदेश दौऱ्यांमध्ये आपल्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला नेण्याबाबतच्या नियमांत बीसीसीआयने मोठा बदल केला आहे. हा बदल करताना बीसीसीआयने कर्णधार विराट कोहलीचा अधिकार काढल्याचेही पाहायला मिळत आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात हा मुद्दा चांगलाच गाजला होता. संघातील एका वरिष्ठ फलंदाजाच्या बायकोला ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ परदेशात राहायचे होते. त्यावेळी हा खेळाडू चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला होता, कारण त्याला आपल्या बायकोने केलेली विनंती मान्य करण्यात आली नव्हती.

परदेश दौऱ्यात आपल्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला न्यायचे असेल तर त्याची आगाऊ माहिती बीसीसीआयला द्यावी लागते. त्याचबरोबर जर ठरलेल्या दिवसांपेक्षा त्यांना जास्त काळ राहायचे असेल तर त्यांना संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांची परवानगी घ्यावी लागत होती. पण आता मात्र असे होणार नाही. या नियमांत बीसीसीआयने बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे.

जेव्हा हा जुना नियम लागू होता, तेव्हा भारताचे बरेच खेळाडू नाराज होते. कारण त्यांच्या विनंतला मान दिला जात नव्हता, असे म्हटले जात होते. त्यामुळे कर्णधार किंवा प्रशिक्षक यांच्याकडे हे अधिकार असू नयेत, असे संघातील खेळाडूंना वाटत होते. त्यामुळे संघात एकवाक्यता किंवा सुसंवाद नसल्याचेही म्हटले गेले. पण आता बीसीसीआयने यामध्ये बदल केला आहे.

बीसीसीआयने केलेल्या नव्या नियमानुसार हा अधिकार प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याकडून काढण्यात आला आहे. आता जर भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूच्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला ठरलेल्या अवधीपेक्षा जास्त काळ परदेशात राहायचे असेल तर त्यांना आता बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :बीसीसीआयविराट कोहली