BCCI Central Contract List Players Salaries: सध्या भारतात IPLची धामधूम सुरु आहे. याचदरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी वर्षासाठी खेळाडूंचे वार्षिक करार जाहीर केले. एकूण ३४ खेळाडूंना या करारबद्ध करण्यात आले. श्रेयस अय्यर आणि इशान किशन या दोघांचे यंदाच्या करारात पुनरागमन झाले आहेत. तसेच अभिषेक शर्मा, वरूण चक्रवर्ती आणि नीतीश कुमार रेड्डी या तिघांना पहिल्यांदाच वार्षिक करारात समाविष्ट करण्यात आले आहे. तर शार्दुल ठाकूर, जितेश शर्मा, आवेश खान आणि केएस भरत या चौघांना या वार्षिक करारातून वगळण्यात आले आहे. या कराराअंतर्गत खेळाडूंना किती पैसे मिळणार जाणून घेऊया.
४ श्रेणींमध्ये करार
बीसीसीआयने २०२४-२५ वर्षासाठी करारबद्ध केलेल्या खेळाडूंची चार गटात विभागणी केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा या चौघांना A+ ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे. केएल राहुल, शुबमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत यांना A ग्रेडमध्ये स्थान मिळाले आहे. सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल यांच्यासह श्रेयस अय्यरला B ग्रेडमध्ये घेण्यात आले आहे. तर रिंकू सिंह तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, आकाश दीप, हर्षित राणा, इशान किशन, अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती आणि नितीश कुमार रेड्डीला C ग्रेडमध्ये संधी देण्यात आली आहे.
कोणत्या श्रेणीला किती पैसे?
बीसीसीआयने वार्षिक कराराची नावे आणि त्यांचे गट जाहीर केले असले तरीही त्यांनी त्यासोबत त्यांना मिळणारी रक्कम नमूद केलेली नाही. पण बीसीसीआय नियमावलीनुसार म्हणजेच BCCI pay guide प्रमाणे, A+ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक ७ कोटी रुपये दिले जातील. त्याखालोखाल A श्रेणीच्या खेळाडूंना वर्षाला ५ कोटींचे मानधन दिले जाईल. B श्रेणीमध्ये असलेल्या खेळाडूंना ३ कोटींची रक्कम मिळेल. तर सर्वात शेवटच्या C श्रेणीतील खेळाडूंना प्रत्येकी १ कोटीची वार्षिक रक्कम दिली जाईल.