जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या १९ व्या हंगामाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा आयपीएलचा उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या वर्षी पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर संघाच्या विक्ट्री परेडदरम्यान, बंगळूरुमध्ये झालेल्या भीषण चेंगराचेंगरीमध्ये अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण जखमी झाले. याच दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी 'द टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले. गेल्या वर्षी आरसीबीच्या पहिल्या विजेतेपदाच्या जल्लोषादरम्यान बंगळूरुमध्ये भीषण चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ११ निष्पाप चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या चाहत्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यंदा बोर्डाने उद्घाटन सोहळा टाळण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात सलामीची लढत
२८ मार्च रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सलामीची लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही. मात्र, क्रिकेटप्रेमींना ३१ मे रोजी होणाऱ्या भव्य समारोप सोहळ्याची मेजवानी मिळणार आहे. गेल्या वर्षी ईडन गार्डन्सवर शाहरुख खान आणि श्रेया घोषाल यांच्या सादरीकरणाने रंगत आणली होती, तसाच काहीसा दिमाखदार सोहळा यंदाही अपेक्षित आहे.