पाकिस्तानचा एकदिवसीय कर्णधार आणि स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी रोखण्यात आले. त्याने एकाच षटकात दोन बीमर चेंडू टाकले, जे फलंदाजांसाठी धोकादायक मानले जाते. त्यामुळेच पंचांनी त्याला गोलंदाजी करण्यापासून थांबवले. शाहीनच्या या कृतीमुळे क्रिकेट जगतात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
बिग बॅश लीगचा दुसरा सामना सोमवारी मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात खेळला गेला. मेलबर्न रेनेगेड्स प्रथम फलंदाजी करत असताना, शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजीसाठी आला. सुरुवातीलाच त्याला फलंदाजांनी लक्ष्य केले. पहिल्या दोन षटकांतत त्याने तब्बल २८ धावा दिल्या. तिसऱ्या षटकातही त्याने निराशाजनक कामगिरी केली. या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार लागला. दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसरा चेंडू नो-बॉल बीमर ठरला. याच षटकातील पाचव्या चेंडूही बीमर ठरला.
क्रिकेटच्या नियमांनुसार, एकाच षटकात दोन बीमर टाकणे हे फलंदाजावर जाणूनबुजून हल्ला केल्यासारखे मानले जाते. या गंभीर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे, पंचांनी तातडीने कठोर निर्णय घेतला. पंचांनी शाहीन शाह आफ्रिदीला त्याचे तिसरे षटक पूर्ण करण्यापासून रोखले. याचा अर्थ, शाहीन शाह आफ्रिदीला त्याच्या षटकात केवळ चार चेंडू टाकता आले आणि उर्वरित दोन चेंडू दुसऱ्या गोलंदाजाकडून टाकून घेण्यात आले. या निर्णयामुळे शाहीनला २.४ षटकांनंतरच गोलंदाजी थांबवावी लागली, जी क्रिकेटच्या मैदानावरील अत्यंत अपमानास्पद घटना आहे.
शाहीन आफ्रिदीने त्याच्या २.४ षटकांच्या स्पेलमध्ये तब्बल ४३ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याचा इकॉनॉमी रेट १६.१० इतका वाईट होता. एका आंतरराष्ट्रीय कर्णधाराने अशा प्रतिष्ठित लीगमध्ये गोलंदाजी करताना नियमांचे वारंवार उल्लंघन करणे आणि बीमरसारखे धोकादायक चेंडू टाकणे, हे पाकिस्तानच्या क्रिकेटची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन करणारे कृत्य ठरले आहे.