Join us

इंग्लंडसाठी फलंदाजीची डोकेदुखी कायम - नासिर हुसेन

पराभवानंतर ‘स्काय स्पोर्टस्’शी बोलताना हूसेन म्हणाला, ‘ब्रॉडचा मुद्दा किंवा नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेण्याचा मुद्दा उपस्थित करून पराभव लपवता येणार नाही. पहिल्या डावात २०४ धावा हे मोठे अपयश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 00:10 IST

Open in App

साऊथम्पटन : वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी पराभवाबाबत हंगामी कर्णधार बेन स्टोक्स याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी संघासाठी फलंदाजी ही अद्यापही डोकेदुखी असल्याची टीका केली आहे.अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला अंतिम एकादशमधून वगळल्याच्या निर्णयावर सामना सुरू होण्याआधीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हाच निर्णय त्यांच्यासाठी मारक ठरला.पराभवानंतर ‘स्काय स्पोर्टस्’शी बोलताना हूसेन म्हणाला, ‘ब्रॉडचा मुद्दा किंवा नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेण्याचा मुद्दा उपस्थित करून पराभव लपवता येणार नाही. पहिल्या डावात २०४ धावा हे मोठे अपयश आहे. संघात फलंदाजीची डोकेदुखी संपलेली नाही. द. आफ्रिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर आमचा संघ घरच्या मैदानावर ड्यूक चेंडूपुढे डगमगतो. रूटच्या अनुपस्थितीत झालेली स्थिती भीतीदायक स्वप्नासारखी होती.’दोन्ही संघ आता मँचेस्टरकडे रवाना होणार असून गुरुवारपासून दुसरा सामना खेळला जाईल. हुसेनच्या मते विंडीजविरुद्ध मालिका जिंकायची झाल्यास इंग्लंडने द. आफ्रिकेविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करायला हवी. (वृत्तसंस्था)‘ओल्ड ट्रफोर्डची खेळपट्टी चांगली असेल. रूट परतल्यानंतर द. आफ्रिकेतील कामगिरीची पुनरावृत्ती करणे आमच्या फलंदाजांपुढे आव्हान असेल. अ‍ॅशेस मालिकेचा सामना असता तर ब्रॉडला खेळविले असते. माझ्या मते, इंग्लंडने विंडीजला कमकुवत मानले. असे नसते तर विंडीजविरुद्ध व्यवस्थापनाने ब्रॉडला निश्चितपणे खेळविले असते.’

टॅग्स :वेस्ट इंडिज