Join us
Daily Top 2Weekly Top 5

तळापर्यंत फलंदाजी, सात गोलंदाजी पर्याय; टी-२० विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी पॉझिटीव्ह संकेत!

T20 World Cup 2026: ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. या विजायातून भारताला केवळ विजयच नाही, तर ४ अत्यंत सकारात्मक संकेत मिळाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:54 IST

Open in App

७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने आपल्या तयारीचा जबरदस्त श्रीगणेशा केला आहे. अभिषेक शर्माची स्फोटक फटकेबाजी आणि रिंकू सिंगच्या फिनिशिंग टचच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव केला. भारताने उभारलेल्या २३८ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १९० धावांत आटोपला.

नागपूरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर संजू सॅमसन (१० धावा) आणि इशान किशन (८ धावा) स्वस्तात बाद झाले. मात्र, त्यानंतर अभिषेक शर्माने मैदानाचा ताबा घेतला. त्याने केवळ ३५ चेंडूत ८४ धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यात ८ उत्तुंग षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. अभिषेकने आपले अर्धशतक अवघ्या २२ चेंडूत पूर्ण केले.

अभिषेकला सूर्यकुमार यादवची (३२ धावा) उत्तम साथ मिळाली. सूर्या फॉर्मसाठी झगडत असला तरी त्याने अभिषेकसोबत ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून डाव सावरला. डावाच्या अखेरीस रिंकू सिंगने आपली फिनिशरची भूमिका चोख बजावत २० चेंडूत नाबाद ४४ धावा कुटल्या, ज्यामुळे भारताने २० षटकांत ७ बाद २३८ धावांचा टप्पा गाठला.

२३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने झुंजार अर्धशतक झळकावले, मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि शिवम दोन विकेट्स मिळवल्या. तर, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांनी सुरुवातीच्या षटकांत महत्त्वाचे ब्रेकथ्रू मिळवून दिले. शिवाय, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनीही टिच्चून गोलंदाजी करत धावगतीवर नियंत्रण ठेवले.

विश्वचषकापूर्वी सकारात्मक संकेत

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पदभार स्वीकारल्यापासून संघात अष्टपैलू खेळाडू आणि खोलवर फलंदाजीवर भर दिला आहे. अक्षर पटेलसारखा फलंदाज ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, ज्यामुळे भारतीय फलंदाजी किती भक्कम आहे हे दिसून आले. या विजयामुळे भारतीय संघासाठी अनेक सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. अभिषेक शर्माची निर्भय फलंदाजी आणि शिवम दुबेची अष्टपैलू कामगिरी भारतासाठी जमेची बाजू ठरली आहे. सॅमसन आणि इशान किशन या सामन्यात अपयशी ठरले असले तरी, आगामी सामन्यांमध्ये ते पुनरागमन करतील अशी आशा संघ व्यवस्थापनाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Deep batting, seven bowling options: Positive signs for Team India!

Web Summary : India's T20 World Cup prep starts strong with a dominant win. Abhishek Sharma's explosive batting and Rinku Singh's finishing shine. All-rounders and deep batting order signal a promising future under coach Gautam Gambhir.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026भारत विरुद्ध न्यूझीलंडऑफ द फिल्ड